सोलापूर जिल्ह्य़ातील गारपीटग्रस्त शेतक-यांना द्यावयाच्या मदतीसाठी शासनाकडून तिसऱ्या टप्प्यातील उर्वरित ७१ कोटींचे अनुदान  जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाले आहे. आतापर्यंत जिल्ह्य़ातील गारपीटग्रस्त शेतक-यांसाठी ३०५ कोटी २७ लाखांचा निधी मिळाला आहे.
ही रक्कम तरी गारपीटग्रस्त शेतक-यांच्या बँक खात्यावर वेळेवर जमा होणार का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
गेल्या फेब्रुवारीअखेर व मार्चच्या प्रारंभी जिल्ह्य़ातील अनेक भागात वादळी वा-यांसह अवकाळी पाऊस व गारपीट झाली होती. त्यामुळे तीन लाख ३७ हजार ८९६ हेक्टर क्षेत्रातील शेतीचे प्रचंड नुकसान झाले होते. यात द्राक्ष, डाळिंब, आंबा, लिंबू, चिकू आदी फळबागांना मोठा फटका बसला होता. शासनाच्या आदेशानुसार जिल्हा प्रशासनाने नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे तयार करून नुकसानीचा अहवाल पाठविला असता त्यावर शासनाने पहिल्या टप्प्यात ६३ कोटी ६० लाख, दुसऱ्या टप्प्यात १७१ कोटी तर आता तिसऱ्या टप्प्यात उर्वरित ७१ कोटी याप्रमाणे आतापर्यंत ३०५ कोटी २७ लाख १९ हजारांचे अनुदान प्राप्त झाले आहे.
प्राप्त झालेल्या अनुदानाच्या रकमेचे वाटप करण्यासाठी शेतक-यांना बँक खाती उघडण्याच्या सूचना दिल्या असता अनेक शेतक-यांनी बँक खाती उघडली तरी प्रत्यक्षात अनुदानाची रक्कम संबंधित शेतक-यांच्या बँक खात्यावर जमा होण्यास विलंब लागला आहे. अद्यापि याबाबतची प्रक्रिया सुरूच असताना आता तिसऱ्या टप्प्यातील अनुदानाची रक्कम तरी बँक खात्यावर वेळेवर जमा होणार का, असा सवाल गारपीटग्रस्त शेतक-यांनी उपस्थित केला आहे.