प्रबोध देशपांडे
अकोला : करोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी समाजात जनजागृती होणे अत्यंत गरजेचे आहे. गाण्याच्या माध्यमातून करोनाविरूद्धचा जागर करण्यासाठी अकोल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी प्रा.संजय खडसे यांनी ‘करोना विरुद्धचे युद्ध हे जिंकू या!’ हे गीत तयार केले. करोनाच्या संकटातून सावरण्यासाठी गाण्यातून समाज प्रबोधन करण्यात येत आहे. या गीताचे विमोचन विभागीय आयुक्त पीयुष सिंह यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

सध्या सर्वत्र करोनाचे विश्वाव्यापी संकट कोसळले आहे. यावर आळा बसण्यासाठी प्रशासनाकडून विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. करोना विषाणू संदर्भात लोकांमध्ये अनेक समज-गैरसमज आहेत. करोना विषाणूचा संसर्ग पसरू नये म्हणून समाजातील प्रत्येक व्यक्तीने काळजी घेणे आवश्यक आहे. करोना विषयी योग्य माहिती पोहोचून समाज जागृत होणे काळची गरज झाली आहे. त्यासाठी संगीताचे प्रभावी माध्यम ठरू शकते, हे ओळखत निवासी उपजिल्हाधिकारी प्रा.संजय खडसे यांनी स्वत: पुढाकार घेऊन एक गीत तयार केले.

करोनाची पार्श्वभूमी, टाळेबंदी व प्रशासनावरील मोठ्या जबाबदारीतून वाढता कामाचा बोजा अशा व्यस्त कार्यातूनही वेळ काढून प्रा.संजय खडसे यांनी गाण्याची निर्मिती केली. गीतलेखन मुकुंद नितोणे यांनी, तर चित्रफित संकलन विश्वाास साठे यांनी केले आहे. गायन स्वत: संजय खडसे यांनी केले. विभागीय आयुक्तांच्या उपस्थित विमोचन व सादरीकरण करण्यात आले. या गीताच्या माध्यमातून करोनाविरुद्धचे युद्ध जिंकण्यासाठी नागरिकांमध्ये प्रबोधन केले जात आहे.

सामाजिक कार्यात नेहमीच तत्पर
आयुष्यातील खडतर प्रवास पूर्ण करून प्रा.संजय खडसे निवासी उपजिल्हाधिकारी पदापर्यंत पोहोचले आहेत. सामाजिक बांधिलकी जोपासत ते नेहमीच सामाजिक कार्यात हिरहिरीने सहभागी असतात. अकोल्यातील ‘मोर्णा मिशन’मध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता. आता करोना संकटाचा सामना करतांनाही एक वरिष्ठ अधिकारी म्हणून ते सदैव कार्यतत्पर आहेत.