महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमधील वादानंतर पक्षसंघटनेत फेरबदल करण्यात आले आहेत. नगर व पारनेर विधानसभा मतदारसंघाच्या जिल्हाध्यक्षपदी सचिन डफळ, याच मतदारसंघाच्या जिल्हा सचिवपदी वसंत लोढा, उपजिल्हाध्यक्षपदी संजय झिंजे व नगर शहराध्यक्षपदी गिरीश जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दोन विधानसभा मतदारसंघांसाठी एक याप्रमाणे एकूण ६ जिल्हाध्यक्ष यापूर्वी नियुक्त केले आहेत. इतर जिल्हाध्यक्ष व पदांमध्ये लवकरच फेरबदल होणार आहेत.
यापूर्वी नगर शहराध्यक्ष म्हणून सतीश मैड काम पाहात होते, त्यांना पदमुक्त करण्यात आले. त्या जागी जाधव यांची नियुक्ती झाली आहे. डफळ पूर्वी पूर्ण जिल्हय़ासाठी जिल्हा संघटक होते. आता त्यांच्यावर दोन मतदारसंघांसाठी अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. जिल्हाध्यक्ष कैलास गिरवले यांची मनपा निवडणुकीनंतर लगेचच पदावरून हकालपट्टी करण्यात आली होती. लोढा यांच्याकडे देण्यात आलेले जिल्हा सचिवपद नव्यानेच निर्माण करण्यात आलेले आहे. डफळ, लोढा व जाधव या तिघांनाही पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नियुक्तीचे पत्र दिले. झिंजे यांना जिल्हा संपर्क अध्यक्ष संतोष धुरी यांनी पत्र दिले.
पक्षाचे नगरसेवक व लोढा, संघटनेतील पदाधिकारी यांच्यात काही दिवसांपूर्वी वाद धुमसत होता. त्यानंतर डफळ यांनी जिल्हा संघटकपदाचा राजीनामा सादर केला होता. त्यामुळे काही दिवसांपूर्वी संपर्क अध्यक्ष व संपर्कप्रमुखांनी काही दिवसांपूर्वी नगरमध्ये येऊन माहिती घेतली होती. परंतु बदल करताना डफळ यांच्यावर पुन्हा विश्वास व्यक्त करण्यात आला.
कार्यकारिणीतील इतर पदे लवकरच जाहीर होतील तसेच संघटनेतील इतर बदलही लवकरच केले जातील, असे डफळ यांनी सांगितले. सध्या नगरमध्ये पक्षाच्या ६५ पैकी ४५ प्रभागांत शाखा असून यापूर्वी २२ हजार सभासदांची नोंदणी झाली आहे. सभासदत्वासाठी पुन्हा नोंदणी मोहीम सुरू करणार असल्याचे डफळ यांनी सांगितले. वादाच्या पाश्र्वभूमीवर नियुक्ती जाहीर करण्यासाठी बोलवलेल्या पत्रकार परिषदेला पक्षाच्या नगरसेवकांना निमंत्रित करण्यात आले नव्हते. ठाकरे यांच्या भेटीत त्यांनी पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांवर कारवाई करण्यास सांगितल्याची माहितीही डफळ यांनी दिली.
विधानसभा निवडणुकीतील उमेदवारीची चाचपणी करण्यासाठी पक्षाची समिती पुढील महिन्यात नगरला येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. या वेळी पक्षाचे पदाधिकारी सुमित वर्मा, परेश पुरोहित, प्रिया मिसाळ, गणेश ननवरे, समनाथ चिंतामणी, मयूर धाडगे आदी उपस्थित होते.