मुंबई ते अलिबाग फेरीबोट सेवा बंद करण्याची मागणी

अलिबाग : करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन राज्यात कठोर निर्बंध १५ मेपर्यंत वाढविण्यात आले आहेत. एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी ई-पास बंधनकारक करण्यात आला आहे. मात्र अलिबाग ते मुंबई दरम्यान जलवाहतूक कुठल्याही निर्बंधांशिवाय सुरू आहे. ज्यातून दररोज प्रवाशांची वाहतूक सुरूच आहे. अलिबाग तालुक्यात करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन जलवाहतूक बंद करण्याची मागणी आता मेरीटाइम बोर्डाकडे करण्यात आली आहे.

Dombivli, poultry farm, Kopar railway station
डोंबिवली जवळील कोपर रेल्वे स्थानकालगत हरितपट्ट्यात कोंबड्यांचा खुराडा, रेल्वे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी
dombivli traffic jam marathi news
माणकोली उड्डाण पुलांवरील वाहनांमुळे रेतीबंदर फाटकात दररोज वाहन कोंडी, वाहतूक पोलीस नसल्याने स्थानिकांकडून नियोजन
Kulaba Bandra Seepz, Metro 3
मुंबईकरांना वाहतूक कोंडीतून अल्प दिलासा, ‘कुलाबा वांद्रे सीप्झ मेट्रो ३’ मार्गिकेचे काम वेगात
Traffic Routes Altered as Nashik s CBS to Canada Corner Road Undergoes 18 Month Concreting Work
काँक्रिटीकरणासाठी नाशिकमधील आठ रस्ते बंद – सीबीएस- कॅनडा कॉर्नर मार्गावर एकेरी वाहतूक

करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन राज्यात आंतर जिल्हा वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आले आहे. अत्यावश्यक कारणाशिवाय प्रवास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात प्रवासासाठी ई-पास काढण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अत्यावश्यक सेवा आणि वैद्यकीय कारणांसाठीच आता एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाता येणार आहे. मात्र जलवाहतुकीसाठी कुठलेही निर्बंध नाहीत. त्यामुळे दररोज हजारो लोकांची वर्दळ या जलवाहतुकीच्या माध्यमातून सुरूच असल्याचे दिसून येत आहे.

मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया ते मांडवा आणि भाऊचा धक्का ते रेवस दरम्यान जलमार्गाने प्रवासी वाहतूक केली जाते. याशिवाय भाऊचा धक्का ते मांडवा रो रो सेवा चालविण्यात येते. यातून एकाच वेळी दीडशे वाहनांची वाहतूक करता येते. दररोज यातून हजारो प्रवासी वाहतूक करत असतात. याशिवाय खासगी स्पीड बोटींमधूनही प्रवाशांची वाहतूक सुरू आहे.

या जलवाहतुकीवर अद्याप कुठलेही निर्बंध घालण्यात आलेले नाहीत. जलवाहतुकीने येणाऱ्या प्रवाशांची करोना चाचणी केली जात नाही. बोटींमधून प्रवास करणाऱ्यांना ई-पासचीही सक्ती केली जात नाही. त्यामुळे विना ई-पास मुंबईतून रायगड जिल्ह्यात प्रवाशांची वाहतूक सुरू असल्याची बाब समोर आली आहे. पूर्ण क्षमतेने प्रवासी वाहतूक सुरू आहे.

अलिबाग तालुक्यात करोनाचा प्रकोप वाढला आहे. तालुक्यात दररोज सरासरी २०० नवे रुग्ण आढळून येत आहेत. दिवसाला सात ते आठ जणांचा करोनामुळे मृत्यू होत आहे. सक्रिय रुग्णांची संख्या ३ हजार २०० वर जाऊन पोहोचली आहे. अशा परीस्थितीत जलप्रवासी वाहतुकीमुळे करोना प्रादुर्भाव अधिकच वाढण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाने ही जलवाहतूक करोनाचा प्रादुर्भाव कमी होईपर्यंत बंद ठेवावी अशी मागणी केली जात आहे. मेरीटाइम बोर्ड कार्यालय, मांडवा आणि मांडवा पोलीस ठाण्यात याबाबतचे निवेदन देण्यात आले आहे.

लसीकरणासाठी मुंबईकर रायगडमध्ये…

मुंबईत लसीकरणासाठी सध्या मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. रांगेत तासन्तास ताटकळावे लागत असल्याने मुंबईकरांनी जवळच्या जिल्ह्यांतील खेड्यांकडे मोर्चा वळवलाआहे. ‘कोविन’द्वारेअलिबाग तालुक्यातील लसीकरण केंद्रांवर  नोंदणी करण्याचे प्रमाण वाढले आहे. लस घेण्यासाठी मुंबईकर अलिबागमध्ये येत असल्याचेही आढळत आहे. दुसरीकडे ग्रामीण भागात लशीसाठी ऑनलाइन नोंदणी करण्यात अडचणी येत असल्याने ते मात्र लसीकरणापासून वंचित राहात आहेत.

एकीकडे करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन जिल्ह्यात कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत. ई-पासशिवाय प्रवास करू नका असे निर्देश दिले जात आहेत. दुसरीकडे जलमार्गाने येणाऱ्यांवर कोणतेच निर्बंध नाहीत. यामुळे करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे. अलिबाग तालुक्यात करोनाचा प्रादुर्भाव कमी होत नाही तोवर सर्व जलवाहतूक सेवा पूर्णपणे बंद ठेवावी.

– सुबोध राऊत, शिवसेना नेते