मदतीच्या माध्यमातून मतदारांशी अधिकाधिक संपर्क

वेध विधानसभेचा

दिगंबर शिंदे, सांगली

संथ वाहणाऱ्या कृष्णामाईने उग्ररूप धारण केले. सलग दहा दिवस सांगलीकरांनी महापुराशी झुंज दिली. जिल्ह्य़ातील चार तालुक्यांना या महापुराची झळ बसली. केवळ जिल्हाच नव्हे तर राज्य ढवळून काढणाऱ्या या महापुराचे येत्या विधानसभा निवडणुकीत परिणाम दिसणार असल्याने विद्यमान, भावी, इच्छुक असे सारे रस्त्यावर उतरले. या महापुराची झळ प्रामुख्याने सांगली, पलूस-कडेगाव, वाळवा आणि शिराळा या चार मतदारसंघांना बसली असून याचे परिणाम सर्वच मतदारसंघातील राजकीय संदर्भ तूर्तास बदलण्याची चिन्हे नसली तरी कोण आपलं, कोण तुपलं याचा हिशोब मतदार करणार हे मात्र निश्चित.

महापुराच्या निमित्ताने अनेक राजकीय दिग्गजांचे पाय सांगलीला लागले, लागत आहेत. एकेका दिवशी चार चार नेते सांगलीत येत आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शर्मिला ठाकरे, आदित्य ठाकरे, धनंजय मुंडे, बाळासाहेब थोरात यांनी पूरग्रस्तांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. अडचणीच्या काळात माणुसकीचा महापूरही सांगलीने जसा पाहिला तसाच राजकीय मतभेद महापुराच्या पाण्यात बुडाल्याचे अनुभवले. तरीही या निमित्ताने काहींनी आपली राजकीय खुंटी बळकट करण्यासाठी महापुराची नामी संधी साधली हे मान्यच करावे लागेल.

इस्लामपूर-वाळव्यात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील तळ ठोकून तर होतेच, पण त्याचबरोबर त्यांच्या पत्नी शैलजा, मुलगा प्रतीक आणि हर्षवर्धन हेही पूरग्रस्तांशी संवाद साधून मदतीचा हात देण्यात अग्रेसर होते. काँग्रेसचे कार्याध्यक्ष आमदार विश्वजित कदम यांनी पलूस तालुक्यात ठाण मांडून आपली छबी सुधारण्याचा प्रयत्नही केला. भारती विद्यापीठातील कर्मचाऱ्यांच्या मदतीने पूरग्रस्तांना मदतीचा हात देत विधानसभेसाठी पेरणी करण्याचा प्रयत्न केला.

सांगलीत भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ यांनी आपली स्वच्छ प्रतिमा येत्या निवडणुकीत तारणार की मारणार याचा विचार न करता पूरग्रस्त भागाला भेटी देऊन दिलासा देण्याचा प्रयत्न केला असला तरी पूरग्रस्तांना मदत साहित्याचे वाटप करताना काही ठिकाणी भेदाभेद झाल्याने त्यांना टीकेलाही तोंड द्यावे लागले. पूरग्रस्तांना वाचविण्यासाठी होडय़ांची उणीव भासत असताना दौरा करण्याच्या निमित्ताने पूरपर्यटन त्यांच्यासाठी लाभदायी ठरण्यापेक्षा अडचणीचे ठरण्याची भीती आहे, तर काँग्रेसचे पृथ्वीराज पाटील हे मात्र प्रथमपासूनच पूरग्रस्तांच्या मदतीला धावत होते. ते आणि त्यांचे पथक पूरग्रस्तांना अन्नपदार्थ पुरविण्यापासून वैद्यकीय सेवा देण्यापर्यंत धावपळ करत होते. राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनीही या निमित्ताने पेरणी करण्याचा प्रयत्न केला, तर शिराळ्यात भाजपचे आमदार शिवाजीराव नाईक यांच्याबरोबरीने मानसिंगराव नाईकांचे कार्यकत्रे मदतीसाठी धावाधाव करीत होते.

सांगली जिल्ह्य़ात विधानसभेचे आठ मतदारसंघ आहेत, या आठही मतदारसंघात काँग्रेस आणि राष्ट्रवादीची एकेकाळी मक्तेदारी होती. राज्यात एकत्र सत्ता उपभोगणारे उभय काँग्रेसचे नेते जिल्ह्य़ात आल्यानंतर मात्र आपापला गट कसा शाबूत राहील याचा विचार करीत होते. सत्तेची वाटणीही सोयीस्कर केली जात होती. जिल्हा परिषद, पंचायत समित्या, ग्रामपंचायती, महापालिका, नगरपालिका, यामध्ये असलेल्या सत्तेच्या पाठबळावर जिल्हा बँक, बाजार समितीतील सत्ता कायम काँग्रेस, राष्ट्रवादीच्या वळचणीलाच होत्या. मात्र मागील विधानसभा निवडणुकीनंतर सारेच संदर्भ बदलले असले तरी स्थानिक स्वराज्य संस्था मिळविण्यासाठी भाजपने तयार नेतृत्वाचा आधार घेतला. या निमित्ताने पक्षाचा पाया विस्तारला. लोकसभा निवडणुकीपासून थेट ग्रामपंचायतीपर्यंत हीच रणनीती भाजपने अवलंबली.

विधानसभेची उमेदवारी मिळविण्यासाठी भाजपमध्येच आता संघर्ष सुरू झाला आहे. मात्र तो टोकाला जाणार नाही, याची दक्षता घेण्यासाठी चंद्रकांतदादांनी पंचगंगेचा अमृत कुंभ जवळ ठेवला आहेच. या अमृतातून कृष्णाकाठची धग शांत करण्याचा प्रयत्न होणार, असे दिसते.

वसंतदादांनी पाणी अडवा, पाणी जिरवा हा संदेश दिला. मात्र सांगलीच्या ज्येष्ठांनी ‘माणसं अडवा, माणसं जिरवा’ यासाठी गमती-जमती केल्या. याच गमती जमती एकवेळ आपल्या अंगलट येतील याची जाणीव पतंगराव कदम यांनी निवडणुकीत करून दिली होती. मात्र त्यापासून बोध घेण्याची गरज त्यावेळी जिल्ह्य़ाचे नेतृत्व करणाऱ्या मंडळींना भासली नाही. सर्वानाच गृहीत धरण्याची मानसिकता आज आघाडीच्या मुळावर उठली आहे.

आघाडी एकदिलाने विधानसभा निवडणुकीला सामोरे जाईल, अशी आजची स्थिती नाही. सांगलीवर वर्चस्व कुणाचे या घोळातच ही मंडळी आजही अडकली आहेत. भाजपमध्ये असलेली खदखद विरोधात वळवून यश मिळविण्याची तयारीही कुणाची दिसत नाही. याचाच नेमका लाभ भाजप उठविणार आहे. भाजपमध्येही एकेकाळी जेजीपी हा गट होता. आजही जिल्हा बँकेतील सत्तेच्या निमित्ताने कार्यरत आहे. मात्र या गटाचा लाभ घेण्यासाठी नेत्यांचीच तयारी दिसत नसल्याने भाजपनेच यावर मात करीत सत्तेच्या जोरावर आघाडीसाठी सुरुंग पेरला आहे. भाजपकडे जिल्हा परिषद, महापालिकेची सत्ता असली तरी बरीच निष्ठावंत मंडळी आजही उपेक्षित आहेत. त्यांच्या आकांक्षांना खतपाणी घालण्यासाठी काँग्रेसकडे आश्वासक नेतृत्वाची उणीवही भासत आहे. जिल्ह्य़ात एकमेव मतदारसंघ हाती असलेल्या शिवसेनेला सत्ता हाती असतानाही फारसा विस्तार करता आलेला नाही. महापालिका निवडणुकीत प्रयत्न करूनही एका मर्यादेपलीकडे सेनेला यश मिळवता आले नाही. येत्या विधानसभा निवडणुकीत वाळवा, पलूस-कडेगाव आणि तासगाव कवठेमहांकाळ हे विरोधकांकडे असलेले तीन मतदारसंघ जिंकण्यासाठी भाजपची रणनीती आहे.

केंद्र आणि राज्यात सत्तेवर असलेल्या भाजपविरुद्ध असलेली नाराजी आणि महापुराच्या संकटाचे राजकारण करण्याची वृत्तीच भाजपला पराभूत करेल. लोकसभा निवडणुकीत भाजपविरोधी मतदानामध्ये विभागणी झाल्यामुळेच आघाडीचा पराभव झाला. रोजगाराची संधी नसलेला तरुण वर्ग, हमी भाव नसल्याने नाराज असलेला शेतकरी वर्ग काँग्रेसच्या पाठीशी राहील.

– पृथ्वीराज पाटील, शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष.

राज्य शासन आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून सिंचन योजनांना मिळालेली गती आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जनतेने ठेवलेला विश्वास यामुळे जिल्ह्य़ात सर्वच जागा भाजपला अनुकूल असून जनता विकासासाठी युतीच्या पाठीशी राहील.

 – आमदार पृथ्वीराज देशमुख, भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष.

विधानसभेचे चित्र

’ सांगली- भाजप

’ मिरज- भाजप

’ जत-  भाजप

’ शिराळा- भाजप

’ खानापूर-आटपाडी- शिवसेना

’ वाळवा- राष्ट्रवादी

’ तासगाव-कवठेमहांकाळ- राष्ट्रवादी

’ पलूस- कडेगाव- काँग्रेस