चाचणी करण्याचे प्रशासनाचे आदेशाकडे दुर्लक्ष

वाडा :  तालुक्यात मोठय़ा संख्येने असलेले कारखाने करोनाच्या संक्रमण कालावधीत सुरूच आहेत.  कंपनी व्यवस्थापनाने कामगारांची करोना चाचणी करावी असा प्रशासनाचा  आदेश असतानाही त्याकडे  व्यवस्थापन दुर्लक्ष  करीत आहेत. त्यामुळे  या कारखान्यांमध्ये मोठय़ा संख्येने काम करीत असलेले कामगार येथील ग्रामीण भागात करोनाचे ‘सुपर स्प्रेडर’ ठरत असल्याचे सांगण्यात  येत आहे.

वाडा औद्योगिक क्षेत्रात सध्या सुरू असलेल्या चारशेहून अधिक कारखान्यांमध्ये  हजारो कामगार काम करीत आहेत. यात स्थानिक कामगारांबरोबरच मुंबई, ठाणे, कल्याण, वसई या मोठय़ा शहरातूनही शेकडो कामगार येत असतात. संसर्गाचा  धोका कमी व्हावा यासाठी कंपन्यांनी दर महिन्याला सर्व कामगारांची करोना चाचणी करण्याचे आदेश वाडा तहसीलदारांनी  २२ एप्रिल रोजी काढलेल्या एका पत्राद्वारे दिले आहेत.  मात्र हे आदेश कंपनी व्यवस्थापन पाळताना दिसून येत नाहीत. त्यामुळे  ग्रामीण भागात करोनाचा मोठय़ा प्रमाणावर फैलाव झाल्याचे बोलले जात आहे.

कंपनीतील कामगारांच्या सुरक्षेसाठी त्यांची करोना चाचणी करावी. सकारात्मक आलेल्या कामगारांची व त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीच्या उपचाराची जबाबदारी कंपनी व्यवस्थापनाने घ्यावी, अशी मागणी कोकण विकास कामगार  संघटनेचे अध्यक्ष महेंद्र ठाकरे यांनी केली आहे.

कामगारांच्या आरोग्याची काळजी घेण्यासंदर्भात आवश्यक त्या सूचना कंपन्यांना देण्यात आल्या आहेत. तलाठय़ांकडून याबाबत आढावा घेण्यात येत आहे.

—डॉ. उद्धव कदम,

तहसीलदार, वाडा.