नाशिकच्या मुथुट फायनान्सवर दरोडेखोरांनी भरदिवसा गोळीबार करत दरोडा टाकला आहे. या घटनेत ऑडिटरचा मृत्यू झाला आहे. तर दोघेजण जखमी झाले आहेत. दरोडेखोरांनी लाखोंचा ऐवज लुटून नेल्याचीही माहिती समोर आली आहे. संजू सॅम्युअल या ऑडिटरचा या घटनेत मृत्यू झाला आहे. कैलास जैन आणि राजू देशपांडे हे दोघेजण या हल्ल्यात जखमी झाले आहेत.

आज सकाळी पावणेअकराच्या सुमारास हा दरोडा पडला. चार बंदुकधारी दरोडेखोरांनी गोळीबार करून ही लुट केली. एका मराठी वृत्तवाहिनीने या संदर्भातले वृत्त दिले आहे. नाशिकमधल्या उंटवाडी भागात मुथुट फायनान्सचं ऑफिस आहे. आज सकाळी दरोडेखोरांनी या कार्यालयात प्रवेश केला आणि कार्यालयातल्या कर्मचाऱ्यांना दमदाटी करण्यास सुरूवात केली. या दरोडेखोरांच्या हातात पिस्तुल होत्या. या दरोडेखोरांनी कार्यालयातल्या कर्मचाऱ्यांना मारहाण केली. सुरक्षा रक्षकाने सायरन वाजवल्याने चिडलेल्या दरोडेखोरांनी गोळीबार केला.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. श्वानपथकातर्फे घटना स्थळाचा आढवा घेण्यात आला. तर फॉरेन्सिक लॅबचे पथक यांनी या प्रकरणाचा कसून तपास सुरू केला आहे. दिवसाढवळ्या झालेल्या या घटनेमुळे नाशिकमध्ये कायदा सुव्यवस्था आहे का? असा प्रश्न आता नाशिककर विचारू लागले आहेत.