करोनानं केलेला शिरकाव आणि त्यानंतर लागू करण्यात आलेल्या लॉकडाउननं अर्थव्यवस्थेवर मोठा आघात झाला. अचानक आलेल्या संकटानं अर्थसाखळीच ठप्प झाली. त्यामुळे उद्योगांना फटका बसण्याबरोबरच बेरोजगारीतही वाढ झाली आहे. याच मुद्यावरून एका नेटकऱ्यानं आमदार रोहित पवार यांना आपण आत्महत्या करणार असल्याचं ट्विट करत बेरोजगारीकडे लक्ष वेधलं. त्यावर रोहित पवार यांनी त्या कार्यकर्त्याची समजूत घातली.

काय घडलं?

“आपल्या माणसाचं चांगलं झालं की साहजिकच आहे, प्रत्येकाला आनंद होतो. तसंच माझंही आहे. मी तिथं जाण्याने त्यांनाही काही प्रमाणात फायदा होत असतो, पण महत्त्वाचं म्हणजे त्यांच्यापासून इतरांनाही प्रेरणा मिळत असते आणि स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा प्रयत्न करणारी व्यक्ती हिरोपेक्षा कमी नसते,” असं ट्विट रोहित पवार यांनी एका नेटकऱ्याला उद्देशून केलं होतं.

त्यावर “दादा मी आत्महत्या करणार आहे
झाडाला दोरी बांधुन देता का??
एक बेरोजगार” असं ट्विट केलं.

या ट्विटला रोहित पवार यांनी उत्तर देत त्याची समजूत घातली. “बेरोजगारी हा ज्वलंत विषय असून त्यावर सर्वांनी मिळून काम करण्याची गरज आहे आणि तुमचा कार्यकर्ता म्हणून त्यासाठी माझे प्रयत्न सुरूच आहेत. पालकांनी मोठ्या अपेक्षेने आपल्याला वाढवलं असताना आपण आत्महत्येचा विचार करणं, योग्य नाही. आपल्यासारख्या JCB वाल्यांनी असा विचार करुन कसं चालेल?,” असं म्हणत रोहित पवार यांनी नेटकऱ्याची समजूत घातली.

“राजकारणात चहा विकल्याचं भांडवल केलं जात, पण…”

“राजकारणात चहा विकल्याचं भांडवल केलं जातं, पण आमच्या बारामतीत मात्र राहुल चौधरी यांनी ‘खासदार’ तर माळेगावमध्ये तेजस तावरे यांनी ‘आमदार’ या नावाचंच चहाचं हॉटेल सुरू केलंय. त्यांचं उदघाटन करुन शुभेच्छा दिल्या. इथल्या चहाची टेस्टही भन्नाट आहे, बरं का! ती घ्यायला तुम्हीही विसरु नका!,” असं मूळ ट्विट रोहित पवार यांनी केलं होतं.