सर्वधर्मसमभावाची शिकवण देणाऱ्या साईबाबांनी आपल्या हयातीत कधीही आपले नाव, जात व धर्म उघड केला नाही. पण साईबाबांचे जन्मस्थान परभणी जिल्ह्य़ातील पाथरी येथे असल्याची चर्चा सुरू झाल्याने वादाला तोंड फुटले असतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी पाथरीच्या विकासासाठी शंभर कोटीचा निधी देण्याचे जाहीर केल्यानंतर हा वाद उफाळून आला आहे. साई जन्मस्थान वादामुळे रविवारपासून शिर्डी बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. पण, साईबाबांचा जन्म नेमका कुठे झाला, याबाबत आतापर्यंत अनेक दावे करण्यात आले आहेत.

साईजन्मस्थळाबाबत असे केले जातात दावे
१. साईबाबांचे जन्मस्थान परभणी जिल्ह्य़ातील पाथरी येथे असल्याची मानले जाते. असे तेथील लोकांचेही म्हणणे आहे. साईसच्चरित्राच्या आठव्या आवृत्तीचा दाखला देत पाथरीकर साईबाबांच्या जन्मस्थळाचा दावा करीत आहेत.

२. साईबाबांचा जन्म तामिळनाडूमध्ये झाल्याचा दावाही केला जातो. त्यांच्या आईचे नाव वैष्णवदेवी तर वडिलांचे नाव अब्दुल सत्तार होते, असेही म्हटले जाते. त्यानंतर ते शिर्डीला आल्याचे बोलले जाते.

३. साईबाबांचे वडील साठे शास्त्री व आई लक्ष्मीबाई असल्याचे एका तामिळ चरित्रात म्हटल्याचे बोलले जाते. (संदर्भ – साईलीला त्रैमासिक १९५२ चा ऑक्टोबर ते डिसेंबरचा अंक)

४. गुजराती साईसुधामधील संदर्भानुसार साईबाबांजा जन्म १८५८मध्ये गुजराती ब्राह्मण कुटुंबात जेरुसलेमच्या जाफा दरवाजात झाला, असाही एका दावा केला जातो.

५. सुमन सुंदर यांनी लिहिलेल्या साईलीला (१९४२) पुस्तकानुसार पाथरी येथे बाबांचा जन्म झाला. गगाभाऊ हे त्यांचे वडील होते तर देवगिरी अम्मा ही त्यांची आई होती, असा दावा करण्यात येतो. पण, हे पाथरी हैदराबादमधील होते, असे मानले जाते.

६. शिर्डीकरांचे म्हणणे आहे की, साईबाबांच्या जन्मस्थळाचा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी करू नये. पाथरीसाठी निधी द्यावा पण पाथरी हे साईबाबांचे जन्मस्थळ होते, असे म्हणू नये. त्यामुळे साईभाक्तांच्या भावना दुखावल्या जात असल्याचे शिर्डीकरांचे म्हणणे आहे.