वंचित बहुजन आघाडीने पुकारलेला बंद हा शांततेच्या मार्गाने पुकारलेला बंद आहे. या बंदला काही लोक जाणीवपूर्वक हिंसक वळण लावण्याचा प्रयत्न करत आहेत. हिंदू मुसलमान दंगल घडवण्याचा संघाचा डाव आहे असाही आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला. हिंसक वळण लावणारे, तोडफोड करणारे कार्यकर्ते हे वंचित बहुजन आघाडीचे नाहीत. बंदच्या दरम्यान काही लोक चेहरा लपवून बंदला हिंसक वळण लावत आहेत. त्यांना पोलिसांनी शोधून काढावं असं आवाहनही प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे.

आमचा बंद शांततेच्या मार्गाने सुरु आहे. आम्हाला तोडफोड करायची असती तर त्याची सुरुवातच हिंसक केली असती. मात्र आम्हाला तसं काहीही करायचं नाही. आमचा बंद हा शांततेच्या मार्गाने सुरु आहे असंही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत प्रकाश आंबेडकर यांनी हे आरोप केले आहेत. आज वंचित बहुजन आघाडीतर्फे बंदची हाक देण्यात आली आहे. CAA, NRC, NPR आणि खासगीकरणाविरोधात हा बंद पुकारण्यात आला आहे.

महाराष्ट्र बंद हा सकाळपासून शांततेत सुरु होता. त्यानंतर मात्र या बंदला हिंसक वळण लागलं. याबाबत प्रकाश आंबेडकर यांना विचारलं असता हिंसाचार घडवणारे वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते नाहीत असं त्यांनी सांगितलं आहे. काही लोक चेहरा लपवून हिंसा घडवत आहेत. या लोकांना पोलिसांनी शोधून काढावं असंही प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केलं.

मुंबईतील सायन, कुर्ला, चेंबूर या ठिकाणी महाराष्ट्र बंदला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. अकोला, पुणे, सोलापूर या ठिकाणीही महाराष्ट्र बंदला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. मात्र ज्या ठिकाणी बंदला हिंसक वळण लागलं आहे ते वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी लावलेलं नाही. जे लोक बंदला हिंसक वळण लावण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई करावी. ते कोणत्या संघटनेचे आहेत हे त्यांना ताब्यात घेतल्यावर लक्षात येईलच असंही प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केलं.