प्रशांत देशमुख 

नागपूर विभागातल्या पाच जिल्ह्यांतील डॉक्टर व अन्य वैद्यकीय मनुष्यबळ नागपुरातील रुग्णालयात नेमण्यात आल्याने ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा कोलमडली आहे.

नागपूर विभागीय आरोग्य उपसंचालक कार्यालयाने अधिकारी व कर्मचाऱ्यांची तात्पुरती सेवा नागपूर कार्यालयाशी संलग्न करण्याचा निर्णय २६ मार्चला घेतला. त्यानुसार विभागातल्या पाच जिल्ह्यांतून २७ डॉक्टर, ३१ परिचारिका, आरोग्यसेविका व अन्य  कर्मचारी असे एकूण ५८  कर्मचाऱ्यांना नागपूरला रुजू होण्यास सांगितले. नागपूरच्याच वसतिगृहात त्यांची सोय करण्यात आली. नागपूर जिल्हा आपत्ती निवारण समितीतर्फे  या सर्वाची नेमणूक गरजेनुसार नागपूरच्या विविध रुग्णालयांत करण्यात आली. मात्र जिल्हा यंत्रणेतील  मनुष्यबळ कमी झाल्याने जिल्हा स्तरावरील सेवा बाधित झाली आहे. मुळात पाचही जिल्ह्यांत वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचा लक्षणीय अनुशेष आहे. त्यातच आता करोना संक्रमणाने जिल्हा यंत्रणेवरील ताण वाढला आहे. या पाचही जिल्ह्यांत दैनंदिन पाचशे ते हजार करोना रुग्ण आढळून येत आहेत. या रुग्णांना हाताळताना जिल्हा यंत्रणा अपुरी ठरत आहे.  त्याचा वैद्यकीय अधिकाऱ्यांवर अतिरिक्त ताण येत असल्याने सेवा बाधित होत असल्याचे एका कनिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्याने स्पष्ट केले. गोंदिया येथून सात, भंडाऱ्यातून पाच, वर्धेतून पाच, गडचिरोलीतून अकरा वैद्यकीय अधिकारी नागपूरला बोलाविण्यात आले. तसेच या पाचही जिल्ह्यांतून अधिपरिचारिका, आरोग्यसेविका, परिचारिका व समुदाय वैद्यकीय अधिकारी नागपूरच्या सेवेत घेण्यात आले आहेत.

प्रत्येकच यंत्रणेवर अतिरिक्त ताण

अधिकारी व कर्मचारी बोलावले होते. मात्र सगळेच आले नाहीत. ज्या ठिकाणी सेवेवर अतिरिक्त ताण आहे, त्याठिकाणी अन्य जिल्ह्यांतील डॉक्टरांची सेवा घेण्याची बाब संपूर्ण महाराष्ट्रात लागू आहे. प्रत्येकच यंत्रणेवर अतिरिक्त ताण आहे. त्यामुळे डॉक्टरांनाही सेवा देणे क्रमप्राप्त ठरते. डॉक्टरांची नेमणूक खासगी नव्हे तर शासनाने अधिग्रहित केलेल्या रुग्णालयात करण्यात आली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डॉ. जयस्वाल, आरोग्य उपसंचालक,  नागपूर विभाग.