विधानसभा निवडणुकांपूर्वी हज हाऊसची निविदा निघावी, यासाठी सत्ताधारी प्रयत्न करीत आहेत. मंगळवारी मुंबई येथे या अनुषंगाने बैठक घेण्यात आली. सिडको प्रशासन येत्या काही दिवसांत निविदा काढेल, असे सांगितले जात आहे. हज हाऊस आणि वंदे मातरम् या दोन्ही सभागृहांचे भूमिपूजन एकाच वेळी होईल. मात्र, हज हाऊसची निविदा पहिल्यांदा निघेल.
शहरातील जिल्हाधिकारी निवासस्थानाच्या शेजारी असणाऱ्या मैदानात ही दोन्ही सभागृहे होणार आहेत. यासाठी तेथील अतिक्रमणे हटविण्यात आली. अतिक्रमण करणाऱ्यांना भूखंड देऊन इतरत्र हलवण्यात आले. त्यांना मोबदलाही देण्यात आला. विधानसभा निवडणुकीपूर्वी हे काम मार्गी लावावे, असे प्रयत्न केले जात आहे. मंगळवारी पालकमंत्री बाळासाहेब थोरात, पशुसंवर्धनमंत्री अब्दुल सत्तार, अल्पसंख्याकमंत्री नसीम खान यांच्या उपस्थितीत एक विशेष बैठक घेण्यात आली. या बैठकीला जिल्हाधिकारी विक्रम कुमार व सिडकोचे प्रशासकही उपस्थित होते. हज हाऊससाठी तयार करण्यात आलेले अंदाजपत्रक २९ कोटी ८८ लाख रुपयांचे आहे. सिडको उत्तर विभागाचे अभियंता मुंबई येथून या अनुषंगाने निविदा काढणार आहेत. वंदे मातरम् सभागृहासाठी साधारण तेवढय़ाच किमतीचे अंदाजपत्रक असावे. मात्र त्यासाठी पुनर्मान्यतेचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. तो आल्यानंतर वंदे मातरम् सभागृहाची निविदाही काढली जाणार आहे.