हिरडी तलावात पोहण्यास गेलेल्या तीन बहिणींसह पित्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. पाण्यात बुडालेले मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात पोलिसांना शुक्रवारी यश आले. सुरुवातीला कोमल पवार हिच्या जबाबावरून पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोद केली. मात्र, मुलींची आई मंगलाबाई पवार यांच्या तक्रारीवरून सहाजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
मंदाकिनी (वय १८), पूजा (वय १६) व पूनम (वय १४) तीन बहिणी पाण्यात बुडाल्याची माहिती मिळताच त्यांचे वडील सुंदरसिंग पवार यांनी धाव घेत मुलींना वाचविण्यासाठी तलावात उडी घेतली. पण त्यांना यश आले नाही. त्यानंतर जोडतळा येथील शेतकऱ्यांनी मंदाकिनीचा मृतदेह बाहेर काढला. दुसऱ्या दिवशी (शुक्रवारी) पूनम, पूजा व सुंदरसिंग पवार यांचे मृतदेह बाहेर काढण्यात येऊन शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात आणले. अहवालात चौघांचा बुडून मृत्यू झाल्याची नोंद असल्याचे सूत्रांनी सांगितले.
मंगलाबाई पवार यांनी घातपाताचा आरोप करीत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिल्याने काही वेळ वातावरण तणावपूर्ण झाले. त्यामुळे पोलिसांनी लेखी तक्रार देण्याची सूचना केली. त्यानंतर मंगलाबाई यांनी सहा आरोपींविरुद्ध तक्रार नोंदविली. कोमल घटनास्थळी हजर होती. तिनेच बहिणी बुडत असल्याचे वडिलांना सांगितल्यावर त्यांनी वाचविण्याचा प्रयत्न करताना त्यांचाही मृत्यू झाला. सुरुवातीला मुलीच्या जबाबावरून आकस्मित मृत्यूची नोंद केली. मात्र, मंगलाबाईंच्या तक्रारीवरून सहा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल झाला. पोलीस तपासात सत्य बाहेर येईल, असे पोलीस अधीक्षक सुधीर दाभाडे यांनी सांगितले.
ग्रामस्थांचे निवेदन
दरम्यान, चौघांच्या मृत्यूप्रकरणी सहाजणांवर दाखल केलेला गुन्हा खोटा असून, घटना घडली त्या दिवशी आरोपींमधील कोणीही गावात नव्हते या कडे लक्ष वेधून हा गुन्हा मागे घ्यावा, अशी मागणी सुमारे अडीचशे ग्रामस्थांनी केली आहे. या बाबत ग्रामस्थांच्या सह्य़ांचे निवेदन पोलीस अधीक्षकांना देण्यात आले.