दिगंबर शिंदे

लोकसभेसाठी भाजप-शिवसेना यांच्यात युती झाली असल्याने राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटनेला ताकद अजमावण्याची संधी हुकली आहे. युतीत हातकणंगले मतदारसंघ हा शिवसेनेकडे आहे.

पश्चिम महाराष्ट्रामध्ये शेट्टी आणि खोत ही शेतकरी चळवळीतील सर्जा-राजाची जोडी म्हणून ओळखली जात होती. गेल्या  लोकसभा निवडणुकीमध्ये हातकणंगलेसह माढा मतदारसंघात संघटनेने ताकद दाखवली होती. हातकणंगले मतदारसंघात राजू शेट्टी विजयी झाले होते तर सदाभाऊ खोत यांचा माढा मतदारसंघात निसटता पराभव झाला होता.

दरम्यानच्या काळात पुलाखालून बरेच पाणी गेले. खोत यांना भाजपने विधान परिषदेवर घेतले. यानंतर राज्यमंत्रिपदही दिले. सत्तेच्या असमतोलामुळे शेट्टी आणि खोत यांच्यात दुरावा निर्माण झाला. या दुराव्यातूनच राज्यमंत्री खोत यांचे पुत्र सागर खोत यांना जिल्हा परिषद निवडणुकीत पराभव पत्करावा लागला. उभयतामध्ये बेबनाव निर्माण झाला. यातून संघटनेच्या प्रदेशाध्यक्षपदी असलेल्या राज्यमंत्री खोत यांची संघटनेतून हकालपट्टी करण्यात आली. यानंतर खोत यांनी भाजपमध्ये सहभागी न होता, रयत क्रांती संघटनेची स्थापना केली. या संघटनेच्या माध्यमातून लोकसभा निवडणूक लढविण्याची तयारीही राज्यमंत्री खोत यांनी चालविली होती. यासाठी हातकणंगले मतदारसंघातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात विकास कामांच्या उद्घाटनाच्या निमित्ताने संपर्कही वाढविला होता.

मात्र भाजप-शिवसेना युतीतील जागा वाटपामध्ये अन्य मित्र पक्षाप्रमाणेच रयत क्रांती संघटनाही बेदखल करण्यात आली. संघटनेला विचारणाही करण्यात आली नाही. यातच युतीच्या जागावाटपानुसार हातकणंगले मतदारसंघ शिवसेनेच्या वाटय़ाला आहे. आणि रयत क्रांती संघटनेची जवळीक भाजपशी आहे. यामुळे या लोकसभा निवडणुकीत स्वतंत्र अस्तित्व दाखविण्याची राज्यमंत्री खोत यांची संधी हुकली आहे. लोकसभेला नाही तर निदान विधानसभेसाठी आपल्या संघटनेच्या कार्यकर्त्यांचा विचार व्हावा, अशी सदाभाऊंची अपेक्षा आहे.