नीरज राऊत/ निखिल मेस्त्री, पालघर

शासकीय धोरण नसल्याने दुकानांमध्ये सहज उपलब्ध; पालघरमधील तरुण अमली पदार्थाच्या आहारी :- हुक्का पार्लरवर बंद असली तरी हुक्क्याचे उपकरण, सुगंधी व हर्बल हुक्का आणि त्याला लागणारे विविध तंबाखूजन्य जिनसा यांच्या विक्रीवर कोणतेही ठोस धोरण शासनाने आखलेले नसल्यामुळे पालघरमध्ये त्यांची राजरोस विक्री होत असल्याचे दिसून आले आहे. हे पदार्थ बहुतेक पान-विडी दुकाने, पानटपऱ्यांवर सहज उपलबध होत असल्याने शहरातील तरुण वर्ग मोठय़ा प्रमाणात त्याकडे आकर्षित होत आहे. असे तरुण कालांतराने अमली पदार्थाच्या सेवनाकडे वळत असून अनेकांना या व्यसनातून सुटका करून घेण्यासाठी पुनर्वसन केंद्रांमध्ये ठेवण्यात आले आहे.

पालघरमधील अनेक पान-विडी दुकानांमध्ये हुक्का उपकरण आणि त्यासाठी लागणारे पदार्थ सहज उपलब्ध होत आहेत. केवळ मजा म्हणून अनेक तरुण याचा वापर करतात. मात्र कालांतराने ते याच्या पूर्ण आहारी गेल्याचे पाहावयास मिळत आहे. अनेक शालेय विद्यार्थीही हुक्क्याचा आस्वाद घेत असून याचे व्यसन त्यांना लागल्याचे दिसून आले आहे, अशी माहिती पालघरमध्ये कार्यरत असणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली. या व्यसनाच्या जिनसा मिळत असलेल्या ठिकाणी कारवाई करून यावर आळा आणण्याची कायद्यात तरतूद नसल्याने त्याची विक्री खुलेआम होत असल्याची माहिती पुढे आली आहे.

पालघर शहरातील काही दुकानदार उघडपणे हुक्का, ते ओढण्यासाठी लागणारी कोळशाची पाकिटे, अनेक सुगंधित फ्लेवर सहज उपलब्ध करून देत आहेत. हुक्क्याची उपकरणे विविध आकार व आकर्षक रूपांत उपलब्ध असून काच, चिनीमाती, माती यांच्यापासून बनवलेली आहेत. या हुक्का उपकरणाची किंमत तीनशे रुपयांपासून एक हजार रुपयांपर्यंत आहे. या हुक्कय़ामध्ये जाळण्यासाठी तयार कोळसा सीलबंद पाकिटातून मिळतो. विविध कंपन्यांच्या नावाने हा कोळसा चारकोल म्हणून मिळतो. हुक्का पेटवल्यानंतर त्यातून येणारा धूर आणखी स्वादयुक्त करण्यासाठी आणि नशा येण्यासाठी सुगंधी तंबाखूजनक जिनसा असलेली पावडर (फ्लेवर्ड हुक्का पाऊच) वापरली जाते. एकावेळी ही पावडर अर्धा ते एक तास चालते. मसाला पान, विविध फळे आणि आइस्क्रीमच्या स्वादात मिळणाऱ्या या पावडरची किंमत त्याच्या विशिष्ट चवीनुसार ठरवली जाते. २०० रुपयांपासून एक हजार रुपयांपर्यंत हे पाऊच उपलब्ध आहेत.

या हुक्कय़ामुळे समूहामध्ये धूम्रपान करणे सोयीचे जात असून मोठय़ा शहरांमध्ये फोफावलेली ही अपसंस्कृती पालघरमध्ये रुजू होऊ  पाहत आहे. पालघरमध्ये असलेल्या विविध महाविद्यालयांत शिकण्यासाठी येणाऱ्या मुंबईच्या विद्यार्थ्यांकडून या प्रकारचे धूम्रपान या भागात आणले जात असल्याचे काहींचे म्हणणे आहे. अलीकडेच अशाच काही व्यसनी विद्यार्थ्यांना पोलिसांनी पकडले होते. त्यांच्याकडे अमली व मादक पदार्थ आढळून आले होते. काही विद्यार्थी या भागात एखादी खोली भाडय़ाने घेतात किंवा खासगी वसतिगृहात राहतात. त्या ठिकाणी अशा प्रकारचे व्यसन केले जात असल्याची माहिती समोर आली आहे.

अमली पदार्थ सेवनही खुलेआम

हुक्कय़ासह पालघर शहरात अमली पदार्थ सेवनही काही ठिकाणी राजरोस होताना दिसते. पालघर रेल्वे स्थानक परिसर, नगर परिषद बागेच्या समोर, पालघर महाविद्यालयाच्या खारेकुरण बाजूच्या नाक्यावर बंद असलेल्या इमारती आणि घरांच्या आडोशाला अमली पदार्थाचे सेवन करण्यात येते. अमली पदार्थाची विक्री करणारी टोळी पालघरमध्ये सक्रिय असून त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी काही समाजसेवकांनी शासनाकडे यापूर्वी तक्रारी केल्या आहेत. मैत्रिणींमुळे अमली पदार्थाचे व्यसन लागलेल्या एका गरीब कुटुंबातील महाविद्यालयीन तरुणीला तिची आई काम करत असलेल्या घरमालकाने व्यसनमुक्ती पुनर्वसन केंद्रात पाठवले. त्याचप्रमाणे पालघर परिसरातील अन्य काही तरुण मुंबई येथील अमली पदार्थ पुनर्वसन केंद्रांमध्ये उपचार घेत असल्याची माहिती पुढे आली आहे. हुक्का सेवन करण्यापासून सुरू होणाऱ्या व्यसनाचे रूपांतर अमली पदार्थाच्या सेवनामध्ये होत असल्याने हुक्क्याच्या राजरोस विक्रीवर र्निबध आणावे, अशी मागणी पालक वर्गाकडून होत आहे.

हुक्का आणि त्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या सुगंधी तंबाखूजन्य पदार्थाच्या विक्रीवर कोणत्याही प्रकारचे र्निबध नाहीत. मात्र हुक्का सेवनादरम्यान अमली पदार्थाचा वापर होत असल्याचे निदर्शनास आल्यास त्याविरोधात कारवाई करण्यात येऊ  शकते. जिल्हा पोलिसांनी अमली पदार्थाच्या विक्रीविरोधात अनेकदा कारवाई केली असून गेल्या काही महिन्यांमध्ये कोटय़वधी रुपयांचा अमली पदार्थाचा साठा जप्त केला आहे.   – योगेश चव्हाण, अतिरिक्त पोलीस अधीक्षक, पालघर