News Flash

संभाजीनगरवर मौन; विकास कामावर बोलणार : आदित्य ठाकरे

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने औरंगाबादचे 'संभाजीनगर' हा मुद्दा अजेंड्यावर घेतला आहे.

(संग्रहित छायाचित्र)

औरंगाबाद महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे तीन दिवस औरंगाबादेत मुक्कामी आहेत. शहरातील विविध चौकात फलकांवर औरंगाबाद शहराचे नाव ‘संभाजीनगर’ करावे या मागणीचा जोर वाढावा अशी रचना मनसेच्या कार्यरत्यांनी केली. त्याच वेळी या प्रश्नावर शिवसेनेने मात्र मौन पाळले असल्याचे दिसून आले. औरंगाबाद येथे दिल्ली-मुंबई औद्योगिक पट्टय़ातील ‘ऑरिक सिटी हॉल’ची पाहणी आदित्य ठाकरे आणि सुभाष देसाई यांनी गुरुवारी केली. तसेच महापालिकेच्या विविध कामांचा आढावा घेतला. या बठकीनंतर पत्रकारांनी त्यांना संभाजीनगरच्या मुद्दय़ावरुन छेडले असता ‘राजकारणावर मी नंतर बोलेन. सध्या काम करण्याकडे कल आहे’, असे सांगत प्रश्न टोलवला. नंतर अन्य एका बैठकीत, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने औरंगाबादचे ‘संभाजीनगर’ हा मुद्दा अजेंड्यावर घेतला आहे. याबाबत विचारले असता, ‘आता फक्त विकासावर बोलणार. निवडणुका आल्या की राजकीय बघू’ म्हणून आदित्य ठाकरे यांनी प्रश्नाला बगल दिली.

यावेळी पत्रकारांशी बोलताना आदित्य म्हणाले, ‘ऑरिक सिटीत अनेक उद्योग येऊ पाहात आहेत. हे काम अजून पुढे वाढतच जाईल. स्थानिकांना रोजगार मिळेल. राज्याच्या महसूलात वाढ होईल. सायकल ट्रॅक पाहून आनंद झाला. पोलिस हौसिंग, सार्वजनिक स्वच्छतागृहावर भर देण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना केल्या असून त्यांच्या प्रकल्प नियोजनात या बाबी आहेत.’

मनसेकडून हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेतल्यानंतर औरंगाबाद येथील महापालिका निवडणुकीमध्ये औरंगाबादचे नाव संभाजीनगर व्हावे ही मागणी उचलून धरली जाईल, असे अलीकडेच मनसेमध्ये पुन्हा प्रवेश घेतलेले माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी सांगितले होते. या दौऱ्याची तयारी करण्यासाठी आलेले मनसेचे आमदार राजू पाटील यांनीही ही मागणी विधिमंडळात करू असे सांगितले होते.

महापालिका निवडणुकांची तयारी करण्याच्या दृष्टीने राज ठाकरे औरंगाबाद येथे मुक्कामी येणार असल्याने शहरातील प्रमुख चौकात त्यांना ‘हिंदू जननायक’ अशी बिरुदावली लिहिली आहे. शहरातील या भगव्या फलकांवरील मुद्दय़ांबाबत पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी मात्र मौन बाळगणेच पसंत केले. पालकमंत्री सुभाष देसाई आणि आदित्य ठाकरे यांनी महापालिकांच्या सुविधांबाबतचा आढावा घेतला. येत्या महिनाभरात कारभारात फरक दिसेल, असेही बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना ठाकरे म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 14, 2020 7:19 am

Web Title: sambhajinagar aurngabad mns shivsena we will talk only development says aditya thackeray nck 90
Next Stories
1 अर्थव्यवस्थेच्या दुरुस्तीची भावनाच सत्ताधाऱ्यांत नाही!
2 ‘१०८ क्रमांका’ची रुग्णसेवा विविध व्याधींनी ‘बाधित’
3 पत्नीचा खून करणाऱ्या पतीला जन्मठेप
Just Now!
X