सुप्रीम कोर्टाने गुरुवारी कलम ३७७ संदर्भातील अत्यंत महत्त्वाचा निर्णय देत दोन सज्ञान व्यक्तींमध्ये परस्पर संमतीने असलेले संबंध म्हणजे गुन्हा नाही, असं जाहीर केलं. हा भारतीय संविधानाच्या दृष्टीने आतापर्यंत सर्वात ऐतिहासिक निर्णय ठरला आहे. या निर्णयाचं सर्वच स्तरांतून स्वागत करण्यात आलं असून, एलजीबीटी संघटनांनीसुद्धा त्याविषयीचा आनंद व्यक्त केला. यातच पुण्यातील समीर समुद्र आणि अमित गोखले यांनीसुद्धा लोकसत्ताशी संवाद साधत त्यांचा आनंद व्यक्त केला.

‘देशाला स्वातंत्र्य मिळाले, तेव्हा स्वातंत्र्यलढय़ासाठी आपले योगदान देणाऱ्या व्यक्तींना जो आनंद झाला असेल, तो आनंद या निर्णयामुळे आम्ही आणि आमच्यासारख्या अनेकांनी अनुभवला. आजपासून सर्वसामान्य नागरिकांना जे कायद्याचं संरक्षण आहे, ते आम्हालाही आहे याचे समाधान आहे. त्यामुळे पोलिसांची, लोकांची किंवा कायद्याची भीती न बाळगता समाजात छातीठोकपणे वावरता येणार आहे. या जाणिवेने आत्मविश्वाससुद्धा वाढला आहे. मी आणि अमित अनेक वर्षे अमेरिकेत राहिलो. तो देश सर्वार्थाने पुढारलेल्या विचारांचा असला, तरी समलैंगिकांचे विवाह त्या देशातही कायदेशीर नव्हते. असे असले तरी तेथे राहताना वाटय़ाला येणारा संघर्ष भारतातील संघर्षांच्या तुलनेत कमी होता. अमेरिकेत समलैंगिक विवाहाला मान्यता मिळताच आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला. गेल्या वर्षी अमेरिकेतून भारतात येऊन स्थायिक होण्याचा निर्णय घेतला, तेव्हा कामाच्या ठिकाणी, घर मिळवताना तसेच समाजात वावरताना पावलोपावली भेदाभेद वाटय़ाला आले. त्यातून मनस्तापही झाला. मात्र आता हे होणार नाही याचे समाधान आहे’, असं ते म्हणाले.

वाचा : Section 377 verdict : ‘अखेर देशाने आम्हाला स्वीकारलं’

समलैंगिकांच्या विवाहांना मान्यता, त्यांना मूल दत्तक घेता यावे यासाठी कायदेशीर तरतूद असा मोठा पल्ला गाठायचा हा महत्त्वाचा मुद्दा अधोरेखित करत त्या दिशेने आपण एक पाऊल पुढे टाकल्याचा आनंद वाटत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.