सिरोंचा तालुक्यातील गोदावरी नदीच्या वडदम व नगरम या दोन घाटांवर वाळू तस्करी करणारे ७८ ट्रक्स व ४ जेसीबी मशिन्स उपविभागीय अधिकारी राममूर्ती व दक्षिण गडचिरोलीचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक राजा यांनी छापा मारून जप्त केले असले तरी राजकीय दबावामुळे अद्याप फौजदारी गुन्हा दाखल झाला नसल्याची धक्कादायक माहिती आहे. दरम्यान, तहसीलदार, खनिकर्म अधिकारी, मंडल अधिकारी, एका राजकीय पक्षनेत्यामुळेच हे प्रकरण दाबले जात असल्याचे बोलले जाते.

गोदावरीच्या वडदम, नगरम, अंकिसा, चिंतरेवला, मुप्पीडगुट्टा या पाच घाटांवरील वाळू तेलंगणात नेली जात आहे. गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालय, तहसीलदार, खनिकर्म अधिकारी, मंडल अधिकारी व पोलिस दलाचे दुर्लक्ष किंबहुना, त्यांच्या आशीर्वादानेच ही तस्करी रात्रंदिवस सुरू आहे. त्यामुळे गोदावरीचे पात्र काही भागात अक्षरश: कोरडे पडले आहे. हे प्रकरण रविवारी उघडकीस आले तरी विधिमंडळ उपनेते विजय वडेट्टीवार यांनी चार महिन्यांपूर्वीच या रॅकेटचा भंडाफोड केला होता. मात्र, भाजप नेत्यांच्या आशीर्वादामुळे ही तस्करी चांगलीच फोफावली. सिरोंचा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व्यंकटेश्वर येनगंटी यांनी, तसेच नगरम घाट हा बंडम रेषेरेड्डी यांनी लिलावात घेतलेला आहे. येनगंटी यांचा पुतण्या अजय येनगंटी हा भाजपचा सिरोंचा तालुका प्रभारी, तसेच तो गडचिरोलीचे पालकमंत्री अंबरीश आत्राम यांच्या अतिशय निकटचा आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांनी सिरोंचाचे तहसीलदार ए.सी. कुमरे व खनिकर्म अधिकारी गोंड यांच्याकडे वारंवार तक्रारी करूनही कारवाई झाली नाही. उलट, मुप्पीडगुडा घाटावरील असेच प्रकरण एका पत्रकाराने उघडकीस आणल्यावर त्याला बेदम मारहाण करून व त्याच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले होते.

मुद्दीगुंटा घाटावरूनही असाच प्रकार सुरू असतांनाच तेथील लोकांनी आंदोलन केल्यावर गुंडांकडून त्यांना मारहाण करण्यात आली. विशेष म्हणजे, तेव्हा असरअल्लीचे एक पोलिस अधिकारी यात सक्रीय होते. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन पोलिस अधीक्षकांनी त्या पोलिस अधिकाऱ्याची थेट मुख्यालयात बदली केली होती. त्यानंतर पुन्हा एकदा वाळू तस्करी जोमात सुरू झाली. विशेष म्हणजे, दिवसाला २०० ते २५० ट्रक वाळू येथून तेलंगणात जात होती. तेलंगणा परमिटचे ट्रक महाराष्ट्रात अशा अवैधपणे येणे गुन्हा आहे. मात्र, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयानेही याकडे दुर्लक्ष केले. दरम्यान, आता कारवाईनंतर महसूल विभागाची सारवासारव सुरू असल्याचा आरोपही या भागातील नागरिक करत आहेत.

पंचनामे सुरू आहेत -राममूर्ती

उपविभागीय अधिकारी राममूर्ती म्हणाले की, पंचनामे सुरू आहेत. त्यानंतर दंडाची रक्कम निश्चित केली जाईल. फौजदारी गुन्ह्य़ांबाबत तहसीलदार कुमरे यांना निर्देश दिले आहेत.

अद्याप लेखी तक्रारच नाही -राजा

रविवारच्या छाप्यानंतर घाटमालक वा ट्रक मालकांवर फौजदारी गुन्हे दाखल केले का, असे दक्षिण गडचिरोलीचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक राजा यांना विचारल्यावर ते म्हणाले की, महसूल विभाग किंवा उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांनी यासंदर्भात आमच्याकडे लेखी तक्रार दाखल न केल्यामुळे कारवाई करता येणार नाही.

तक्रार दाखल करू -कुमरे  

तहसीलदार कुमरे म्हणाले की, आताच उपविभागीय अधिकाऱ्यांचा तक्रार करण्यासंदर्भात दूरध्वनी आला होता. त्यानुसार तक्रार करणार आहे. मात्र, पोलिस ठाण्यात सायंकाळी ५ वाजेपर्यंत तक्रार झालेली नव्हती. दरम्यान, लोकसत्ता वार्ताहराने चौकशी केल्यानंतर आता कुठे कागदपत्रांची हालचाल सुरू झाल्याची माहिती या तिन्ही कार्यालयातील सूत्रांनी दिली.