धनगर आरक्षणावरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला. धनगर आरक्षणासाठी जेव्हा बारामतीमध्ये आंदोलन सुरु होते. तेव्हा, एकही बारामतीकर नेता त्यांच्या भेटीला आला नव्हता. आता मात्र ते पोपटासारखे बडबडत आहेत. हे लोक आता समाजासमाजामध्ये भांडणे लावत आहेत, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी पवार कुटुंबीयांवर नाव न घेता केला.

सांगली येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. ते म्हणाले, आम्ही मराठा आरक्षणाचा निर्णय घेतला आहे. लवकरच धनगर समाजालाही आरक्षण मिळेल. धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची आम्ही शिफारस करणार आहोत. यामध्ये आदिवासी समाजाचे आरक्षण कमी होणार नाही, असा दिलासा त्यांनी यावेळी दिला. तसेच ज्यावेळी बारामतीमध्ये धनगर समाजाचे नेते बसले होते. तेव्हा एकही बारामतीकर तिथे आले नव्हते. त्यावेळी फक्त आमचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे हे गेले होते. मात्र, हेच लोक आता पोपटासारखे बडबडत आहेत. ते आता समाजासमाजात भांडणे लावत आहेत, अशी टीका त्यांनी केली.

मराठा आरक्षणावरुन ओबीसी समाजात गैरसमज पसरवले जात असल्याचेही ते म्हणाले. ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लावू देणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.