पाळलेला कुत्रा चावला म्हणून कुत्र्याच्या मालकाला ६ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. सांगली जिल्हा न्यायालयाने ही शीक्षा सुनावली आहे. २०१५ मध्ये घडलेल्या या घटनेतील खटल्यामध्ये सांगली जिल्हा न्यायालयाने ६ साक्षीदारांची साक्ष तपासल्यानंतर कुत्र्याचे मालक विठ्ठल महादेव साखरे आणि गोविंद महादेव साखरे यांना दोषी ठरवलं आहे.

एप्रिल २०१५ साली सांगलीच्या वारणाली येथे सायकलवरुन जाणाऱ्या बँक कर्मचारी भिमाशंकर तारापुरे यांना एका कुत्र्याने चावा घेतला होता. तारापुरे यांच्यासह आणखी चौघांना या कुत्र्याने चावा घेतला होता. कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तींनी कुत्र्याचे मालक विठ्ठल साखरे आणि गोविंद साखरे यांना याबाबतचा जाब विचारला असता, साखरे बंधुंनी जखमींनाच उलट उत्तरं देण्यास सुरूवात केली. कुत्र्याच्या मालकांनी दिलेल्या उद्धट उत्तरामुळे तारापुरे यांनी विश्रामबाग पोलीस स्थानकात मालकाविरोधात गुन्हा दाखल केला होता. न्यायालयाने अडीच वर्षांनंतर याप्रकरणात निकाल दिला आहे. न्यायालयाने विठ्ठल महादेव साखरे आणि गोविंद महादेव साखरे यांना दोषी ठरवत ६ हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास १ महिने साधी कैद अशी शिक्षा ठोठावली आहे.