संजय राठोड यांच्या आवाहनाने चर्चा

नितीन पखाले, यवतमाळ</strong>

विदर्भातील शिवसेनेचा विधानसभेचा अपराजीत मतदारसंघ असलेल्या दिग्रस- दारव्हा- नेर मतदारसंघातून युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी निवडणूक लढवावी, अशी जाहीर विनंती या मतदारसंघाचे विद्यमान आमदार तथा महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी दारव्हा येथील ‘विजय संकल्प’ मेळाव्यात बोलताना केली. राठोड यांच्या या आग्रहाने मंचावर बसलेले आदित्य ठाकरेही क्षणभर अचंबित झाले. या आवाहनामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नाईकांना शह देण्यासाठी राठोड पुसदमधून तर निवडणूक लढणार नाहीत ना, अशी चर्चा सुरू झाली.

दारव्हा येथे बुधवारी सायंकाळी शिवसेनेची जनआशीर्वाद यात्रा पोहोचली. यावेळी आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या विजय संकल्प मेळाव्यात संजय राठोड यांनी भाषण करताना आदित्य ठाकरे यांनी दिग्रस मतदारसंघातून निवडणूक लढवावी, अशी जाहीर विनंती केली. यावेळी बोलताना ते म्हणाले, विधानसभा निवडणूक लढवण्याची हीच योग्य वेळ आहे. संपूर्ण महाराष्ट्र आदित्य यांची वाट बघत आहे. तुम्ही दिग्रस मतदारसंघातून निवडणूक लढवावी, अशी येथील जनतेच्या वतीने विनंती करतो. येथे उमेदवारी अर्ज भरायला फक्त एकदा या. त्यानंतर विजयाचे प्रमाणपत्र घेऊन आम्ही मुंबईला येऊ . शिवसेना या मतदारसंघात सर्व विरोधकांची अनामत रक्कम जप्त करण्याची ताकद ठेवून आहे, असे राठोड म्हणाले.

आदित्य ठाकरे यांनी या आग्रहाबद्दल मंचावरूनच अभिवादन करून उपस्थितांचे आभार मानले. मात्र राठोड यांनी बोलण्याच्या ओघात हे आवाहन केले की यामागे त्यांची काही राजकीय खेळी आहे, याबाबत विविध तर्क लावले जात आहेत. कारण, दिग्रस मतदारसंघात संजय राठोड यापूर्वी तीनदा मोठय़ा मतांनी विजयी झाले. गेल्यावेळी ८० हजार मताधिक्य घेऊन त्यांनी राज्यात दुसरा क्रमांक मिळवला होता. यावेळी एक लाखापेक्षा अधिक मताधिक्याने विजयी होण्याचे ध्येय ठरवलेल्या राठोड यांनी आदित्य यांना अनपेक्षित ‘ऑफर’ दिल्याने राजकीय विश्लेषकही बुचकळ्यात पडले आहेत.

या रणनीतीमागे राठोड यांच्या मनात अन्य मतदारसंघाचा पर्याय तर नाही ना, अशीही चर्चा आहे. दिग्रस आणि पुसद हे दोन मतदारसंघ बंजाराबहुल आहेत. दिग्रसवर शिवसेनेचे वर्चस्व आहेच, तर पुसदची जागा युतीत शिवसेनेकडेच आहे. पुसदवर वर्चस्व असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार मनोहर नाईक व त्यांचे चिरंजीव इंद्रनील यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले होते. नाईक यांच्या या खेळीमागे संजय राठोड यांच्या बंजारा समाजातील वाढत्या वर्चस्वाला धक्का देण्याचा हेतू असावा, अशी शंका शिवसेनेच्या गोटात होती.

नाईक यांनी शिवसेनेत यावे, यासाठी शिवसेनेच्याच काही लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेतल्याचेही स्पष्ट झाले. मात्र नंतर नाईक कुटुंबीयांनी शिवसेना प्रवेशाच्या विषयाला बगल दिली. आता तर खुद्द मनोहर नाईक यांनीच आपण शिवसेनेत जाणार नसल्याचे स्पष्ट केले. तरीही नाईकांचा धोका टळला नाही. त्यामुळे तर संजय राठोड यांनी आदित्य ठाकरे यांना दिग्रसमधून निवडणूक लढवण्याची गुगली टाकली नाही ना, असे बोलले जात आहे. आदित्य दिग्रसमधून आणि लगतच्या पुसदमधून स्वत: संजय राठोड तर निवडणूक लढणार नाही ना, या चर्चेने राजकारण ढवळून निघत आहे.