रणजितसिंह मोहिते- पाटील यांच्या पक्षांतराने माढा मतदार संघावर कोणताही परिणाम होणार नाही, तसेच खासदार उदयनराजे भोसले यांनाही मागील वेळेप्रमाणे मोठय़ा मताधिक्याने निवडून आणणार आहे. सातारा जिल्ह्यतील आमदार आणि उदयनराजे भोसले यांच्यामध्ये असलेले सर्व मतभेद मिटले असल्याचे आमदार शशिकांत शिंदे यांनी सातारा येथे सांगितले.

सातारा येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्या प्रचाराच्या नियोजनासाठी राष्ट्रवादी काँग्रेस भवनात जिल्ह्यातील आमदार व प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीनंतर शिंदे पत्रकारांशी बोलत होते. या वेळी खासदार उदयनराजे भोसले, आमदार शशिकांत शिंदे, बाळासाहेब पाटील, शिवेंद्रसिंहराजे भोसले, मकरंद पाटील आदि उपस्थित होते.

माढा मतदार संघावर मोहिते पाटील यांच्या जाण्याने काहीही फरक पडणार नाही आणि त्यांचा इतर मतदार संघावर काही फरक पडेल असे वाटत नाही. आता मतदार संघ मोठे झाले आहेत आणि निवडणुका आता व्यक्ति केंद्रित राहिलेल्या नाहीत. तेथे पक्षाची ताकद मोठी आहे. आजही त्यात काहीही फरक पडलेला नाही आणि लोकसभेच्या निवडणुका स्थानिक विषयावर होत नाहीत. सध्या केंद्र सरकारविरोधात प्रचंड नाराजी आहे. त्याचा फायदा आम्ही उठवला पाहिजे. साताऱ्यात पक्षातील नेत्यांमधील भांडणामुळे व गटबाजीमुळे फलटण येथील मेळाव्यातील भांडणामुळे शरद पवार यांनी माढा मतदार संघातील निवडणूक सोडून दिली अशी चर्चा आहे. याबाबत बोलताना ते म्हणाले, की जिल्ह्यात अशी भांडणे व गटबाजी नाही, तेथे शेखर गोरे यांच्या विषयी चर्चा  होते आणि असे काही नाही. वंचित आघाडीच्या मागण्या फारच अवास्तव होत्या. त्या मान्य करणे शक्य नव्हते. आमची त्यांच्याशी युती करण्याची आमची प्रामाणिक भूमिका होती मात्र त्यांच्या मागण्यांपुढे युती होऊ शकली नाही. त्यामुळे ते वेगळी चर्चा करत आहेत. सातारा जिल्ह्यeतील पक्षाच्या आमदार आणि खासदारांमध्ये काय मतभेद होते ते सर्वाना माहीत आहे. ते मतभेद आता मिटले आहेत. उदयनराजेंना मागील मताधिक्याएव्हढय़ा मताधिक्यांनी निवडून आणणार असल्याचे त्यांनी सांगितले.