लाखो पर्यटकांचे आकर्षण असलेले आणि महाबळेश्वर, पाचगणीसह सुमारे २५ गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या वेण्णा लेकला मोठी गळती लागली आहे. महाबळेश्वर नगरपालिकेच्या पदाधिकारी व प्रशासनाने चक्क दोन ट्रक कपड्यांचा वापर करून ही गळती तात्पुरती रोखण्याचा प्रयत्न केला असून त्यांना यात त्यांना ७० ते ८० टक्के यश आल्याचे सांगण्यात येते. गेल्या दोन महिन्यांपूर्वीच वेण्णा लेकला गळती लागल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले होते. परंतु, अधिकाऱ्यांनी ही गळती धोकादायक नसून अशाप्रकारची गळती सगळीकडेच असते, असे सांगून वेळ मारून नेली होती. ही गळती रोखण्यासाठी पुढे कोणतीच कार्यवाही झाली नव्हती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अखेर कार्यकारी अभियंता विजय घोगरे यांनी रविवारी लष्कराच्या काही निवृत्त अभियंत्यांना घेऊन तलावाला भेट दिली. त्यावेळी या अभियंत्यांनी गळती रोखण्यासाठी कॉटनचे कपडे, गाद्या, उशा वापरण्याचा सल्ला दिला. त्यांच्या सूचनेप्रमाणे नगरपालिका प्रशासन आणि स्थानिकांनी कपडे गोळा करून रात्री उशिरापर्यंत ज्या ठिकाणी गळती होत होती. तिथे कपडे टाकले व नंतर माती टाकली. त्यामुळे गळतीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे. आता जिल्हा प्रशासन याबाबत पुढे काय कार्यवाही करते याकडे स्थानिकांचे लक्ष लागले आहे.

काही दिवसांपूर्वी स्थानिक आमदार मकरंद पाटील यांनी अधिकाऱ्यांसमवेत या भागाला भेट दिली होती. त्यावेळी अधिकाऱ्यांनी गळतीचा धोका नसल्याचे सांगत आमदारांना दिलासा दिला. योग्य वेळीच अधिकाऱ्यांनी काळजी घेतली असती तर ही गळती पूर्वीच रोखता आली असती, अशी प्रतिक्रिया स्थानिकांनी दिली आहे. दरम्यान, महाबळेश्वर, पाचगणीला वर्षभरात सुमारे १८ ते २० लाख पर्यटक भेट देत असतात.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Satara venna lake leak two trucks cloths use for stop water
First published on: 20-11-2017 at 14:58 IST