वाई पोलीस ठाण्यात १३ पोलीस कर्मचारी करोनाबाधित आढळल्याने पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. त्याचबरोबर पोलीस ठाण्याचे कामकाज तीन दिवस स्थगित करून भुईंज पोलीस ठाण्यातून चालवण्यात येणार आहे. दरम्यान, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी या करोनाबाधित कर्मचाऱ्यांची भेट घेतली.

पोलिसांच्या माहितीनुसार, सोमवारी रात्री शहरात या १३ पोलीस कर्मचाऱ्यांसह २८ जण करोनाबाधित आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. वाई पोलीस ठाण्यातील वाहतूक शाखेचे व इतर असे तेरा कर्मचारी बाधित झाल्याचे आढळून आले आहे. यामुळे वाई पोलीस ठाण्यातील चार अधिकारी आणि ५० कर्मचाऱ्यांचे क्वारंटाइन करण्यात आले आहे. पोलीस ठाण्यातील आणि वाई उपअधीक्षक कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे करोना चाचणीसाठी घशातील स्त्रवाचे नुमुने घेण्यात आले आहेत. या सर्वांचा अहवाल दोन दिवसात येईल.

दरम्यान, पोलीस अधीक्षक सातपुते यांनी पोलीस कर्मचाऱ्यांच्या भेटीदरम्यान, करोना संसर्गाचा प्रादुर्भावापासून स्वतःची आणि कुटुंबियांची कशी काळजी घ्यावी याचे कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. पालिकेच्या तीने ताबडतोबीने पोलीस ठाण्याचे उप अधीक्षक कार्यालय व पोलीस वसाहतीचे निर्जंतुकीकरण करण्याची प्रक्रिया सकाळपासून हाती घेण्यात आली. पोलीस कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयाना क्वारंटाइन करण्यात आले आहे. त्यांच्या सहवासातील आणि कुटुंबियांचे नमुने चाचणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

पोलीस कर्मचाऱ्यांबरोबर पोलीस ठाण्यापासून शंभर मीटर अंतरावरील मासे आणि चिकन विक्रेता व त्याच्या कुटुंबियातील १८ व्यक्ती करोनाबाधित आढळून आले आहेत. वाई तालुक्यात सध्या १८३ रुग्ण बाधित रुग्ण असून ९७ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. सहा बाधितांची मृत्यू झाला आहे. ऐंशी रुग्ण उपचार घेत आहेत. शहरात ५९ रुग्ण तर पसरणीत १९ रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे बाजारपेठेसह अर्धेअधिक शहर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून बंद आहे.