उंच आकाशात झेपावत फुटणारे औटगोळे, त्यातून प्रकट होऊन नंतर काही क्षणातच लुप्त होणारे रंगीबेरंगी तारे, तारामंडळ, धबधबे, म्हैसूर कारंजे आदी पारंपरिक कलाकृतींबरोबरच सध्या अडचणीत सापडलेल्या शेतक ऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधणारे ‘किसान वाचवा-देश वाचवा’ असा नेमकेपणाने संदेश देणारे घोषवाक्य शोभेच्या दारूकामाद्वारे सादर झाल्याचे पाहून लाखो नेत्रांचे पारणे फिटले. सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धेश्वर यात्रेचा समारोप शुक्रवारी रात्री होम मैदानावर शोभेच्या भव्य दारूकाम तथा आतषबाजीने झाला.
सुमारे साडेआठशे वर्षांची प्राचीन परंपरा लाभलेल्या व चार दिवस चालणाऱ्या सिद्धेश्वर यात्रेची सांगता शोभेच्या दारूकामाने होते. यात्रेत महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगण व आंध्र प्रदेशातून लाखो भाविक येतात. तर शोभेच्या दारूकामाचे सादरीकरण करण्यासाठी सोलापूरसह सांगली, बीड, कराड आदी भागातून कलावंत येतात. या शोभेच्या दारूकामाची कीर्ती सर्वदूर पसरली आहे. यंदा यात्रेच्या सांगता होताना सोलापूरसह सांगली, कोल्हापूर, बीड, सातारा इत्यादी भागातील कलाकारांनी हजेरी लावून सेवा रुजू केली.
तत्पूर्वी, सिद्धेश्वर महाराजांच्या नंदीध्वजांची मिरवणूक सायंकाळी उत्तर कसब्यातील हिरेहब्बू मठातून निघाली. ही मिरवणूक वाजत-गाजत रात्री होम मैदानावर पोहोचल्यानंतर शोभेच्या दारूकामाला प्रारंभ झाला. दारूकाम पाहण्यासाठी लाखो भाविक तथा आबालवृद्ध नागरिक एक तास अगोदरपासून होम मैदानावर एकत्र आले होते. नंदीध्वजांचे आगमन होताच ‘एकदा भक्तलिंग हर बोला हर, सिद्धेश्वर महाराज की जय’ या घोषणेने सारा आसमंत दुमदुमून गेला. त्यापाठोपाठ शोभेच्या दारूकामाविषयीची  वाढत गेलेली उत्सुकता संपली.
सांगली जिल्ह्य़ातील विटा येथील बाबालाल फटाका स्टॉलच्या कलाकारांनी सूर्योदयाने शोभेच्या दारूकामाला सुरूवात केली. सूर्यचक्र, पृथ्वीचक्र, मुलूख मैदानी तोफ, त्रिशूल, रंगीत वृक्ष, जादूचे वृक्ष, सहा इंची ऑलिम्पिक सिलिंडर, दरबार फ्लॉव्हर, बिग मल्टिकलर आउट आदी कलाप्रकार सादर करण्यात आले. त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्य़ाच्या हातकणंगले तालुक्यातील वडगाव येथील शिकलगार फायर वर्क्‍सचे हमीद शिकलगार यांनी आकाशात उंच भरारी घेऊन फुटणारे रंगीबेरंगी औटगोळे सादर करून सर्वाचे लक्ष वेधले. स्काय बॉल, अनार हुक्के पाऊस, २१ फुटी नागराज, सूर्योदय, पाळणा चक्र, म्हैसूर कारंजा, सातमुखी व पचमुखी चक्र, २० फुटी कमान, जादूई फुले, धबधबा आदी स्वरूपात शिकलगार यांनी कलाविष्कार सादर केला. तर कराड येथील आदित्य फायर वर्क्‍सने सुदर्शन चक्र, दांडपट्टा चक्र, पंचमुखी चक्र, धबधबा, वृक्ष, ओम आकाराचे सादरीकरण, म्हैसूर कारंजा सादर केला.