News Flash

‘वडिलांचे प्राण वाचले असते!’

दुसरी चाचणी नकारात्मक आल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात येणार होते

विरारच्या यशवंतनगर येथे राहणारे सुखराज वैष्णव (६८) हे ७ एप्रिलपासून या रुग्णालयात उपचार घेत होते. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली होती. मात्र त्यांची दुसरी चाचणी नकारात्मक आल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात येणार होते. ‘वडिलांची देखभाल नीट व्हावी, यासाठी आम्ही घरात वैद्यकीय व्यवस्था केली होती. मात्र, रुग्णालयाकडून दुसरी चाचणी करण्यास टाळाटाळ होत होती,’ असे वैष्णव यांचा मुलगा सुखराजने म्हटले. ‘आम्ही रुग्णालयावर विसंबून न राहता त्यांना घरी नेले असते तर माझ्या वडिलांचे प्राण वाचले असते,’ अशी खंत त्याने व्यक्त केली. मयत वैष्णव यांचे धारावीत दुकान असून त्यांना दोन मुले आणि दोन मुली असा परिवार आहे. आतापर्यंत रुग्णालयाचे साडेचार लाख रुपयांचे बिल झाले होते. विशेष म्हणजे दुर्घटना घडल्यावर रुग्णालयातून त्यांना कुणी माहिती दिली नाही. सकाळी ७ वाजता चेन्नई येथून एका नातेवाईकाने टीव्हीवरील बातम्या पाहून दूरध्वनी करून कळवले.

कष्टकरी मातेचा आधार हरपला!

विरार पूर्वेच्या फुलपाडा येथे राहणारा अमेय राऊत (२३) या तरुणाचा या आगीत दुर्दैवी मृत्यू झाला. तो घरातील एकुलता एक मुलगा. त्याच्या वडिलांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले होते. आई घरगुती खानावळ चालवून अमेयच्या शिक्षणाचा भार पेलत होती. शिक्षण घेतल्याशिवाय गरिबीच्या दुष्टचक्रातून बाहेर येता येणार नाही, याची अमेयला जाण होती. त्यामुळे तो जिद्दीने सीएचं शिक्षण घेत होता. अंतिम वर्षाच्या परीक्षेसाठी तयारी करताना एका सीएच्या हाताखाली तो प्रशिक्षणही घेत होता. करोनाची लागण झाल्यानंतर त्याला  शनिवारी विजयवल्लभ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती सुधारत होती. तो लवकर घरी परतणार होता. मात्र त्यापूर्वी या दुर्दैवी घटनेत त्याचा बळी गेला. त्याच्या आईला याचा जबर मानसिक धक्का बसला आहे. एकुलता एक आणि भविष्याचा आधार गेल्याने ती पुरती कोलमडली आहे.

सुटकेच्या काही तास आधी मृत्यूने गाठले

पालघरच्या अल्याळी गावातील रहिवाशी नीलेश भोईर (३७) याचा या आगीत मृत्यू झाला. तो घरातील एकुलता एक कमवता मुलगा. काही वर्षांपूर्वी त्याच्या वडिलांचे निधन झाले होते. निलेशला करोनाची लागण झाल्यानंतर त्याला या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्याची प्रकृती सुरवातीला गंभीर होती. त्यामुळे त्याला दोन रेमडेसिविर तसेच टोसिलिझुमाब इंजेक्शने देण्यात आली. त्यानंतर त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाली. त्यामुळे त्याला अतिदक्षता विभागातून सर्वसाधारण विभागात हलवण्यात येणार होते. मात्र तिथे खाटा शिल्लक नाही, असे आम्हाला रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात येत होते, अशी माहिती मयत नीलेशचे मामा राजेश किणी यांनी दिली. त्यामुळेच नीलेशने शुक्रवारी डिस्चार्ज घेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, त्याआधीच मृत्यूने त्याला गाठले. नीलेशच्या आईला देखील करोनाची लागण झाली असून तिच्यावर पालघरच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पतीच्या मृत्यूच्या धक्क्याने निधन

विजयवल्लभ रुग्णालयात लागलेल्या आगीत कुमार दोशी (४५) यांचा मृत्यू झाला. तर त्यांच्या मृत्यूचे वृत्त समजताच त्यांच्या पत्नीचेही हृदयविकाराच्या धक्क््याने निधन झाले. वसई पश्चिामेकडील शंभर फुटी रोड परिसरात दोशी कुटुंबीय राहत होते. यात कुमार किशोर दोशी (४५) आणि त्यांच्या पत्नी चांदणी दोशी यांना काही दिवसांपू्र्वी करोनाची लागण झाली होती. कुमार यांच्यावर विजय वल्लभ रुग्णालयात तर चांदणी यांच्यावर विरारमधील जीवदानी रुग्णालयात उपचार सुरू होते. शुक्रवारी पहाटे लागलेल्या आगीत कुमार दोशी यांचा मृत्यू झाला. त्यांच्या निधनाची धक्कादायक माहिती चांदणी यांना मिळताच त्यांचा शोक अनावर झाला. आपला पती गेल्याचं समजताच त्यांचंदेखील हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. मातापित्यांच्या मृत्यूमुळे त्यांची १४ वर्षांची मुलगी पोरकी झाली आहे.

मुलीच्या लग्नाच्या आनंदात असताना आघात

नालासोपारा नाळे गावात राहणारे जनार्दन म्हात्रे (६३) यांच्या घरात मुलीच्या लग्नाची तयारी सुरू असताना आगीत त्यांचा बळी गेला. जनार्दन म्हात्रे हे सिमेंट व्यावसायिक होते.  त्यांना तीन मुली होत्या. त्यात नम्रता व नमिता या दोन जुळ्या मुली आहेत. यातील नमिताचे दोन वर्षापूर्वी लग्न झाले होते. तर नम्रताचे शनिवारी २४ एप्रिल रोजी लग्न होते. मात्र दहा दिवसांपूर्वी जनार्दन म्हात्रे यांना करोनाचा संसर्ग झाल्यामुळे तसेच शासनाने टाळेबंदी घोषित केल्यामुळे लग्नसोहळा पुढे ढकलण्यात आला. उपचारासाठी त्यांना नालासोपारा येथील अलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र २१ एप्रिलला त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना विरार येथील विजय वल्लभ रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचारासाठी हलविण्यात आले. त्यानंतर गुरुवारी रात्रीपर्यंत त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते. त्यांना लवकरच घरी सोडणार होते. मात्र शुक्रवारी पहाटे लागलेल्या आगीत त्यांचा जीव गेला.

करोनातून सुटका, काळाची झडप

नवापूर येथे राहाणाऱ्या डॉ. मीनल नाईक यांच्या आईचा विजय वल्लभ रुग्णालयात लागलेल्या आगीत गुदमरून मृत्यू आला. डॉक्टर मीनल नाईक यांच्या आई उमा सुरेश कनगुटकर (६३) या मुंबई दादरला राहत होत्या. मागील आठवड्यात त्यांच्या आईला करोनाची लागण झाली. पण मुंबईत खाटा उपलब्ध नसल्याने डॉक्टर मीनल नाईक यांनी आईला विरारच्या विजय वल्लभ रुग्णालयात ५ दिवसांपूर्वी दाखल केले. नाईक यांनी त्यांच्यासाठी दोन खासगी परिचारिका ठेवल्या होत्या. आईसाठी त्यांनी स्वत: बायपॅपचे यंत्र ६० हजार रुपये भरून खरेदी केले होती. त्याचबरोबर त्यांनी रक्तद्रव (प्लाझ्मा) सुद्धा आणले होते. त्यांच्या आईच्या प्रकृतीत सुधारणा होऊ लागली होती. त्यांना शुक्रवारी अतिदक्षता विभागातून सर्वसाधारण विभागात हलवण्यात येणार असल्याचे डॉक्टरांनी आदल्या रात्रीच सांगितले होते. मात्र, मध्यरात्री होत्याचे नव्हते घडले. ‘मला मध्यरात्री परिचारिकेचा फोन आला व आगीची माहिती समजली. तातडीने येथे धाव घेतली असता, संपूर्ण अतिदक्षता विभाग ज्वाळांनी वेढला गेला होता. रुग्णालयात आपत्कालीन सुरक्षेची कोणतीही यंत्रणा नव्हती,’असे डॉ. नाईक यांनी सांगितले.

संकलन: सुहास बिऱ्हाडे, प्रसेनजीत इंगळे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 24, 2021 12:03 am

Web Title: save life virar fire in hospital akp 94
Next Stories
1 आरोग्य विभागाच्या रुग्णालयांना अजूनही अग्निसुरक्षा कवच नाही!
2 Coronavirus – दिलासादायक : राज्यात दिवसभरात ७४ हजार ४५ रूग्णांची करोनावर मात
3 “राज्यातील सर्व रुग्णालयांचे ‘फायर’ आणि ‘ऑक्सिजन ऑडीट’ करा”
Just Now!
X