लहान मुलांच्या अपहरणाच्या गंभीर घटनांमुळे अनेकदा पोलिसांची झोप उडत असली तरी एका शाळकरी मुलानेच स्वत:च्या अपहरणाचा बनाव रचून पोलीस यंत्रणेला कामाला लावण्याचा प्रकार काल येथे घडला. साखरतर येथे राहणाऱ्या मेहेरान रिझवान बुडिये (वय १६ वष्रे) हा मुलगा दररोज उद्यमनगर भागातील खासगी शिकवणीसाठी येतो. काल दुपारी चारच्या सुमारास तो अशाच प्रकारे तेथे रिक्षातून पोचला आणि त्यानंतर थोडय़ाच वेळात आईला फोनकरून आपले अपहरण झाले असल्याची धक्कादायक माहिती दिली. ‘चारजणांनी माझे अपहरण केले असून सध्या मी अज्ञात स्थळी आहे. या ठिकाणी भवताली दाट झाडी आहे, पण हा परिसर माझ्या परिचयाचा नाही. अपहरणकर्ते पाच लाख रुपये मागत आहेत. ते दिले तरच मला चंपक मैदानाजवळ सोडण्यात येईल,’ असे त्याने फोनवर सांगितले. त्याचे वडील परदेशी असल्यामुळे आईसह सर्व कुटुंबीयांची भीतीने गाळण उडाली आणि त्यांनी शहर पोलीस ठाणे गाठले. पोलीस निरीक्षक इंद्रजीत काटकर यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने जिल्हाभरात संदेश पोचवला आणि सर्वत्र नाकाबंदी करून वाहनांची तपासणी सुरू झाली. दरम्यान, संबंधित मुलाने फोन बंद करून ठेवल्यामुळे आणखी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. पण त्याने मारुती मंदिर परिसरातूनच फोन केला असल्याचे पोलिसांना लक्षात आले होते. त्यामुळे तेथे कसून तपासणी सुरू झाली. त्याचबरोबर रेल्वे स्थानक आणि महामार्गासह सर्वत्र पोलीस यंत्रणा कामाला लागली.  दरम्यान, कोकणनगर भागात बुडिये कुटुंबीयांचा फ्लॅट असल्याची माहिती असल्यामुळे काहीजणांनी तेथे शोध घेण्याचा प्रयत्न केला. पण तो मुलगा किल्ली खिशात ठेवून आतमध्येच बसून राहिला होता. त्यामुळे कोणाला लक्षात येऊ शकले नाही. अखेर रात्री ९च्या सुमारास तो स्वत:च तेथून बाहेर पडला. तेव्हा परिचितांपैकी कोणी तरी त्याला ओळखले. त्याच्या कुटुंबीयांनी लगेच तेथे धाव घेऊन त्याला ताब्यात घेतले आणि पोलीस ठाण्यामध्ये आणले.

पोलीस निरीक्षक काटकर यांनी त्याला समज देऊन रात्री उशिरा कुटुंबीयांच्या ताब्यात दिले.