मिरजोळे पाडावेवाडीतील निखिल अरूण कांबळे या शाळकरी मुलाचा दुसऱ्या अल्पवयीन मुलाने अवघ्या ७०० रुपयांसाठी खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

सातव्या इयत्तेत शिकत असलेला निखिल मिरजोळे पाडावेवाडी येथून ११ फेब्रुवारीला बेपत्ता  झाला होता. कुटुंबियांसह पोलिसांनीही त्याला शोधण्याचा प्रयत्न  केला. पण यश आले नाही. दरम्यान शनिवारी सकाळी घवाळीवाडी येथे एक मृतदेह आढळून आला होता. अंगावरील कपडे, शाळेची बॅग यावरून हा मृतदेह निखिलचा असल्याचे स्पष्ट झाले. नातेवाईकांनीही हा मृतदेह निखिलचा असल्याचे ओळखले.  त्यानंतर पोलिसांनी निखिलच्या मित्रांची चौकशी केली असता त्यापैकी एक अल्पवयीन मित्र संशयास्पद वाटला. तपासात सुरूवातीला त्याने पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी आपल्या पद्धतीने चौकशी केल्यानंतर निखिलची हत्या केल्याची कबुली त्या मित्राने दिली आहे. निखिलकडून त्याने एक हजार रुपये घेतले होते. त्यातील ३०० रुपये परत केले. उर्वरित ७०० रुपये देण्यासाठी निखिलने त्याच्याकडे तगादा लावला होता. परंतु त्याच्याकडे पैसे नव्हते. वारंवार निखिल पैशासाठी तगादा लावत असल्याने त्याचा खून करण्याचा कट त्याने रचला.

गेल्या ११ फेब्रुवारीला दुपारी ४ वाजता निखिल क्लासला जातो, असे सांगून घराबाहेर पडला होता. त्याच दरम्यान त्याची या मित्राशी भेट झाली. निखिलला घेऊन तो पाडावेवाडीतून वहाळ पार करत जंगलातून घवाळीवाडी सडा येथे पोहोचला. तोपर्यंत निखिलला काहीच कल्पना नव्हती. घवाळीवाडी सडा येथे पुन्हा दोघांमध्ये पैशावरून बाचाबाची झाली. त्यानंतर त्याने निखिलचा गळा दाबून हत्त्या केली. त्यानंतर त्याच्या मृतदेहावर दगड टाकून ठेचला. मृतदेह एका खड्डय़ात ठेवून तो कोणालाही सहज दिसणार नाही, याची काळजी त्याने घेतली. तसेच निखिलची बॅग नजिकच्या बांधापलिकडे गवतात फेकून दिली.

या अल्पवयीन मुलाने नववीत शाळा सोडली असून तो घरीच असतो. परिसरातील मित्रांना सोबत घेऊन क्रिकेट खेळणे, चायनिजच्या गाडीवर मौजमजा करणे हाच उद्य्ोग तो करत होता. मौजमजेसाठी त्याने निखिलकडून हजार रुपये घेतल्याचेही त्याने कबूल केले आहे. रविवारी पोलिसांनी घेतलेल्या प्रात्यक्षिकात त्याने घटनाक्रम पोलिसांना दाखविला. त्याने केलेल्या कृत्याने पोलीसही अवाक् झाले.  पोलि त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. हत्या करण्यासाठी इतर कोणालाही त्याने सोबत घेतले नसल्याचेही चौकशीत निष्पन्न झाले आहे.  त्या दोघांच्या संपर्कात असलेल्या मित्रांचेही जबाब पोलिसांनी नोंदवले आहेत.

निखिलचा खून झाल्याचे शनिवारी सकाळी स्पष्ट झाल्यानंतर सायंकाळी त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रूग्णालयात आणण्यात आला . शवविच्छेदन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रात्री नातेवाईकांनी दोषींवर कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका घेतली होती.

रविवारी सकाळी पालकांसह नातेवाईकांनी अप्पर पोलीस अधिक्षक विशाल गायकवाड यांची भेट घेऊन दोषींवर कडक कारवाई करा, अशी मागणी केली. त्यानंतर गायकवाड यांनी मृतदेह ताब्यात घेण्याची विनंती केल्यानंतर नातेवाईकांनी निखिलचा मृतदेह ताब्यात घेतला.