News Flash

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण : प्रज्ञासिंगला दोषमुक्त करण्याच्या निर्णयास निधर्मी संघटनेचा विरोध

दहशतवादविरोधी पथकाचे तत्कालीन प्रमुख हेमंत करकरे यांनी या प्रकरणी योग्य तपास करून भक्कम पुरावे गोळा केले.

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण : प्रज्ञासिंगला दोषमुक्त करण्याच्या निर्णयास निधर्मी संघटनेचा विरोध
मालेगाव येथे निधर्मी संघटनेच्या वतीने आयोजित सभेत बोलताना जनता दलाचे नेते बुलंद एक्बाल. 

 

मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी भक्कम पुरावे असतांना साध्वी प्रज्ञासिंगसह पाच संशयितांना दोषमुक्त करण्याचा राष्ट्रीय तपास यंत्रणेचा निर्णय हा केंद्रातील भाजप सरकारच्या दबावाचा परिपाक आहे. या विरोधात निधर्मी संघटनेच्या वतीने न्यायालय तसेच जनआंदोलन अशा दोन्ही आघाडय़ांवर लढा देण्याचा निर्धार संघटनेचे अध्यक्ष व जनता दलाचे नेते बुलंद एकबाल यांनी केला आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या या भूमिकेबद्दल सध्या काँग्रेस अश्रू ढाळत असली तरी त्यांच्या नाकर्तेपणामुळेच देशात भगव्या दहशतवादाला खतपाणी मिळाल्याचा आरोप बुलंद यांनी केला.

सप्टेंबर २००८ मध्ये येथील भिक्कू चौकात झालेल्या बॉम्बस्फोटात सात जणांचा बळी तर ८० पेक्षा अधिक जण जखमी झाले होते. या प्रकरणी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, कर्नल पुरोहितसह १६ जण सध्या तुरूंगात आहेत. सुरूवातीला राज्याच्या दहशतवाद प्रतिबंधक पथकाकडे असलेल्या या प्रकरणाचा तपास नंतर राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपविण्यात आला. राष्ट्रीय तपास यंत्रणेने न्यायालयात नुकतेच या प्रकरणाचे पुरवणी आरोपपत्र सादर केले असून त्यात साध्वीसह पाच जणांना आरोपातून वगळण्याचा तर अन्य १० जणांवरील मोक्का रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या संदर्भात निधर्मी संघटनेच्या वतीने बॉम्बस्फोट झालेल्या भिक्कू चौकात रविवारी रात्री सभा घेण्यात आली. या सभेत बुलंद यांनी राष्ट्रीय तपास यंत्रणेची भूमिका संशयास्पद असून स्फोटात बळी पडलेल्या व्यक्तिंच्या नातेवाईकांना तसेच मालेगावकरांना ती मान्य नसल्याचे म्हटले आहे.

दहशतवादविरोधी पथकाचे तत्कालीन प्रमुख हेमंत करकरे यांनी या प्रकरणी योग्य तपास करून भक्कम पुरावे गोळा केले. असे असतांना घूमजाव करत राष्ट्रीय तपास यंत्रणा संशयितांना आरोपमुक्त करत असेल तर ते दुर्दैव असल्याचे बुलंद यांनी नमूद केले. संशयित जर निर्दोष असतील तर या प्रकरणातील खरे गुन्हेगार कोण, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या या भूमिकेला विरोध करण्यासाठी आगामी काळात जनआंदोलन तसेच न्यायालयीन लढाई लढण्यात येईल. त्याचाच भाग म्हणून येत्या शुक्रवारी शहरातील सर्व चौकांमध्ये निदर्शने करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या भूमिकेविरोधात याच ठिकाणी शहर काँग्रेसतर्फे दोन दिवसांपूर्वी धरणे आंदोलन करण्यात आले होते. हा धागा पकडून काँग्रेसची ही भूमिका दुटप्पी असल्याचा आरोप बुलंद यांनी केला. २००६ व २००८ मध्ये येथे झालेल्या बॉम्बस्फोटाच्या घटनांवेळी देशात व राज्यात काँग्रेसची सत्ता होती. त्यामुळे तेव्हा जर वेळेत हे आरोपपत्र दाखल केले गेले असते तर काँग्रेसवर अश्रू ढाळण्याची आज वेळ आली नसती, असा टोलाही त्यांनी लगावला. या सभेत डॉ. निहाल अहमद अन्सारी, जनता दलाचे सरचिटणीस मुश्तकीम डिग्निटी, सय्यद बशीर, फारूक फिरदौसी आदी उपस्थित होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 17, 2016 2:11 am

Web Title: secular organization opposing on pragya singh defect free
टॅग : Malegaon Blast
Next Stories
1 वीटभट्टी कामगारांची मुले शिक्षणाचे धडे गिरवताहेत!
2 ‘मराठीतील खऱ्या इतिहासाची परंपरा शून्य’
3 ‘सोलापूर जिल्ह्य़ात दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी’
Just Now!
X