12 November 2019

News Flash

विसर्जन मिरवणुकीत ‘मिठाचा खडा?’

मराठमोळय़ा परंपरेला ‘स्थानिक शिवसेना स्टाईल’ची आडकाठी

विघ्नहर्त्यां गणरायाचे आगमन पारंपरिक वाद्यांच्या निनादात झाले असले तरी निरोप घेताना मात्र विघ्नहर्त्यांला कानठळय़ा बसतील, असेच दिसते. विसर्जन मिरवणुकीत शिवसेनेने डीजेसाठी परवानगी मागितली असून, त्यामुळेच ही शक्यता निर्माण झाली आहे. ‘दुधात मिठाचा खडा’ टाकण्याचाच हा प्रकार असल्याची प्रतिक्रिया शहरात व्यक्त होत आहे.
स्थापनेच्या मिरवणुकांमध्ये केवळ नगरकरच नव्हेतर, गणपती बाप्पाही सुखावला असावा. कारण स्थापनेला दिवसभर शहरात केवळ पारंपरिक वाद्य, ढोलताशांचाच निनाद कानी पडला. शहरातील सर्वच मंडळांनी डीजेला फाटा देऊन या उत्सवाला लागलेले हिडीस वळण टाळण्याचा प्रयत्न केला, तो यशस्वीही झाला. डीजेला फाटा, परिसरातील महिलांचा सहभाग यासह अनेक मंडळांचे अशाच स्वरूपाचे पारंपरिक उपक्रम यामुळे यंदा गणरायाचे आगमन अतिशय प्रसन्न आणि मंगलमय वातावरणात झाले. हे वातावरण विसर्जन मिरवणुकीतही टिकेल, अशी नगरकरांना अपेक्षा आहे. मात्र शिवसेनेने पुन्हा एकदा ‘दुधात मिठाचा खडा’ टाकण्याची तयारी सुरू केली आहे. मिरवणुकीत इन मीन बारा-तेरा मंडळे सहभागी होतात. अन्य सर्व मंडळांनी स्थापनेच्या मिरवणुकांप्रमाणेच विसर्जन मिरवणुकीतही डीजेला हद्दपार करण्याचा निर्णय घेतला असताना या मराठमोळय़ा परंपरेला ‘स्थानिक शिवसेना स्टाईल’ची आडकाठी होणार असे दिसते.
शिवसेनाप्रमुख भले मराठमोळय़ा परंपरेचे पुरस्कर्ते असोत, नगरमध्ये स्थानिक ‘स्टाईल’च महत्त्वाची मानली जाते. शहरात गेल्या वर्षांपासून पारंपरिक वाद्यांना बरे दिवस आले आहेत. त्याचे आम नगरकरांनी स्वागतही केले. मागच्या मिरवणुकीत मानातील मंडळांनी डीजेला फाटा देण्याचा निर्णय घेऊन तो अमलातही आणला. ऐनवेळी त्याला अपवाद केला तो शिवसेनेचे शहरप्रमुख संभाजी कदम यांच्या मंडळाने. त्यांचे मंडळ मानाच्या यादीत असून त्यांनी ऐनवेळी मिरवणुकीत डीजेचाच दणदणाट केला. त्यानंतर यंदा स्थापनेच्या मिरवणुका शंभर टक्के पारंपरिक वाद्ये ढोलताशांच्या निनादात जल्लोषात पार पडल्या. या पाश्र्वभूमीवर विसर्जन मिरवणूकही यंदा या ठेक्यातच पार पडेल, अशी अपेक्षा नगरकरांना अजूनही आहे.
शहरात स्थापन झालेल्या ढोलताशांच्या विविध पथकांनी खरेतर या वाद्यांना पुन्हा सुवर्णझळाळी प्राप्त करून दिली. गेल्या वर्षी ही सुरुवात होऊन या हौशी कलाकारांची शहरात यंदा सात ते आठ पथके तयार झाली असून, अन्य व्यावसायिक पथकेही उपलब्ध आहेत. ही वाद्ये, पारंपरिक कसरतींचे विविध डाव याला मिळणारा प्रतिसादही उत्तम आहे. मात्र ही पथके, असे कसरतीचे डाव यात तरुणाईला संधी मिळत नाही, त्यांनी काय करायचे, त्यांच्या उत्साहाला आवर घालणे मान्य नसल्यानेच डीजेचा हट्ट धरला जात आहे. प्रशासनाने याबाबत विश्वासात न घेता सक्ती केल्याची तक्रारही केली जात असून त्याचीच ही प्रतिक्रिया असल्याचे सांगितले जाते. कारणे काहीही असोत, याबाबत नापसंती व्यक्त होत असून, प्रशासन कोणती भूमिका घेते याकडेही लक्ष लागले आहे. मात्र याबाबत संबंधित सर्वाशीच चर्चा करू, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

First Published on September 24, 2015 3:35 am

Web Title: sena application for dj in immersion procession of lord ganesha