News Flash

वसईमध्ये लसीकरण केंद्रात ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू; आरोग्य सुविधा नसल्याने संताप

केंद्रात रुग्णवाहिका तसेच प्राथमिक उपचाराची सोय नसल्याने मृत्यू झाल्याचा आरोप

प्रातिनिधक (PTI)

वसई विरार महानगर पालिकेच्या नालासोपारा येथील आरोग्य केंद्रात लसीकरणासाठी गेलेल्या एका ६३ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला. उन्हामुळे चक्कर येऊन पडल्याने मृत्यू झाल्याची माहिती पालिका डॉक्टरांनी दिली आहे. मात्र या केंद्रात रुग्णवाहिका तसेच प्राथमिक उपचाराची सोय नसल्याने मृत्यू झाल्याचा आरोप उपस्थित नागरिकांनी केला आहे.

शुक्रवारी सकाळी १० च्या सुमारास नालासोपारा पश्चिमेच्या पाटणकर परिसरात राहणारे हरीशभाई पांचाळ (६३) याच परिसरातील महानगरपालिकेच्या लसीकरण केंद्रात लसीकरणासाठी गेले होते. ते नाव नोंदणी करण्यासाठी रांगेत उभे राहिले असता अचानक चक्कर आली आणि खाली पडले. त्यांना जवळच्या पालिका रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.

यावेळी पांचाळ यांच्यासोबत रांगेत उभ्या असलेल्या नागरिकांनी माहिती दिली की, लसीकरण केंद्रात रुग्णवाहिका उपलब्ध नव्हती, जी रुग्णवाहिका होती ती केवळ डॉक्टरांना ने आण करण्यासाठी होती, त्यात ऑक्सिजनची कोणतही सुविधा नव्हती. त्यामुळे रुग्णवाहिका चालकाने रुग्णाला नेण्यास नकार दिला. या ठिकाणी उपस्थित सामाजिक कार्यकर्ते निमेश वसा यांनी मध्यस्थी करून रुग्णवाहिकेतून पांचाळ यांना नेण्यासाठी भाग पाडले. मात्र पांचाळ यांचा रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच मृत्यू झाला.

वसा यांनी लसीकरण केंद्रावर कोणत्याही सुविधा नसल्याचा आरोप सुद्धा केला आहे. या ठिकाणी किमान प्राथमिक सुविधा असत्या तर पांचाळ यांचा जीव वाचला असता, असे ते म्हणाले.

आणखी वाचा- पुण्यात लॉकडाउन? अजित पवारांसोबतच्या बैठकीनंतर विभागीय आयुक्तांची महत्वाची माहिती

“या रुग्णाला आधीच मधुमेहाचा त्रास होता, तसेच सर्व आरोग्य केंद्रावर रुग्णवाहिका आणि ऑक्सिजन सुविधा उपलब्ध आहेत. लास घेण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला आहे,” असं वसई विरार महानगर पालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेखा वाळके यांनी सांगितलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 12, 2021 2:45 pm

Web Title: senior citizen died during vaccinaton drive in vasai sgy 87
Next Stories
1 सरकारने तुझं माझं करण्यापेक्षा मराठा आरक्षण प्रश्न सोडवावा – संभाजीराजे
2 “सरकारची जत्रा अन् कारवाई सतरा!” गोपीचंद पडळकरांचा पुन्हा सरकारला इशारा!
3 एमपीएससी परीक्षा गोंधळावर अजित पवारांनी मांडलं स्पष्ट मत; म्हणाले…
Just Now!
X