सोलापूर : महाराष्ट्र आणि कर्नाटकातील ऐतिहासिक मंदिरांसह प्राचीन घडामोडींवरील भाष्यकार, ज्येष्ठ शिलालेख अभ्यासक आनंद कुं भार (वय ८०) यांचे गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजता सोलापुरात राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या अचानक निधनामुळे इतिहास संशोधन क्षेत्राला धक्का बसला आहे.

कुं भार यांच्या पत्नीचे गेल्याच वर्षी निधन झाले होते. त्यांच्या पश्चात दोन पुत्र, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी पूर्व भागातील अशोक चौकात त्यांच्या निवासस्थानी धाव घेतली.

कुं भार यांनी मराठी व कन्नडसह विविध भाषांतील शिलालेखांवर संशोधन करून अनेक ऐतिहासिक घडामोडींवर प्रकाश टाकला होता. विशेषत: सोलापूरजवळ हत्तरसंग येथे भीमा व सीना नदी संगमावर हजार वर्षांंपूर्वीपासून अस्तित्वात असलेल्या संगमेश्वर मंदिरातील मराठी शिलालेख सर्वप्रथम कुं भार यांनी शोधून काढला होता. इतिहासात मराठीतील पहिला शिलालेख कर्नाटकातील श्रवणबळगोळ येथील बाहुबली मंदिरात असल्याचा सार्वत्रिक समज होता. परंतु हत्तरसंग येथील संगमेश्वर मंदिरातील मराठीतील शिलालेख शके  ९४० कालयुक्त संवत्सर माघ शुध्द प्रतिपदा म्हणजे फेब्रुवारी १०१९ या काळात लिहिला गेला आहे. ‘वांछितो विजया हाऐवा’ ही मराठी भाषेतील ओळ या शिलालेखावर सापडली. मराठीत अस्तित्वात असलेला हा पहिलाच शिलालेख असण्याबाबत नंतर शिक्कामोर्तब झाले. याकामी कुं भार यांनी केलेले संशोधनकार्य इतिहासात नोंद घ्यावी, असेच झाले आहे.

कुंभार हे मुळात सुरुवातीला भारतीय लष्करात तार खात्यात सेवेत होते. परंतु औपचारिक अभ्यास नसतानाही त्यांनी आयुष्यभर इतिहास विषयाचा व्यासंग जोपासला होता. नंतर महावितरण कंपनीत रूजू झाल्यानंतरही त्यांचा इतिहासाविषयीचा व्यासंग उत्तरोत्तर वाढत गेला. त्यांचे व्यक्तिमत्त्व अतिशय साधे होते. त्यांचे राहते घरदेखील पन्हाळी पत्र्यांचे छत असलेले अतिशय साधेसुधे होते. असंख्य प्राचीन वास्तूंरूपी पुस्तकांचे त्यांच्या घरात भांडार होते.  कुं भार यांनी सुमारे सत्तर हजार दुर्मीळ पुस्तकांचा खजिना जतन करून ठेवला आहे. त्यांच्या या सुमारे साठ दशकांच्या इतिहास विशेषत: शिलालेख संशोधनातील उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना अनेक मानाचे पुरस्कार मिळाले आहेत.