News Flash

‘लोकसत्ता’चे प्रतिनिधी अशोक तुपे यांचे निधन

शेती, पाणी, सहकार व राजकारणाचे अभ्यासक

(संग्रहित छायाचित्र)

दैनिक ‘लोकसत्ता’चे वरिष्ठ वार्ताहर, शेती, पाणी, सहकार व राजकारणाचे अभ्यासक अशोक तुपे (वय ५८) यांचे आज, गुरुवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, सून, आई, तीन भाऊ असा परिवार आहे. अशोक तुपे यांच्या पार्थिवावर रात्री उशिरा त्यांच्या गावी, कान्हेगाव (श्रीरामपूर) येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनाबद्दल विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी दु:ख व्यक्त केले.

अशोक तुपे गेल्या काही दिवसांपासून करोना संसर्गामुळे नगर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार घेत होते. त्यांनी दोन दिवसांपूर्वी करोनावर मातही केली होती, परंतु  सकाळी त्यांना हृदयविकाराचा झटका आला व त्यातच त्यांची प्राणज्योत दुपारी मालवली.

शेती, पाणी, सहकार व राजकारणाचे अभ्यासक

अशोक तुपे यांनी ग्रामीण भागात राहूनही पत्रकारिता क्षेत्रात भरीव योगदान दिले. शेती, पाणी, सहकार हे त्यांच्या  अभ्यासाचे विषय होते. राज्य सरकार वसंतराव नाईक कृषी पत्रकारिता पुरस्कार, वरुणराज भिडे पत्रकारिता पुरस्कारासह विविध पुरस्कार त्यांना प्राप्त झाले होते. ग्रामीण भागात वार्ताहर म्हणून काम करणाऱ्यांना त्यांनी सदैव मार्गदर्शन केले. सुरुवातीला त्यांनी काही काळ दैनिक ‘सार्वमत’मध्ये वार्ताहर म्हणून काम केले. त्यानंतर सन १९९५ मध्ये दैनिक ‘लोकसत्ता’ची नगर आवृत्ती सुरू झाल्यानंतर ते ‘लोकसत्ता’मध्ये रुजू झाले.

शरद जोशी यांच्या पस्तीस वर्षांपूर्वीच्या, श्रीरामपूरमधील भाषणामुळे अशोक तुपे शेतकरी संघटनेच्या आंदोलनाकडे ओढले गेले. त्यातूनच पुढे त्यांनी शेती प्रश्नाला वाचा फोडण्याचे काम पत्रकारितेच्या माध्यमातून सुरूकेले. स्व. शरद जोशी, खासदार राजू शेट्टी, रघुनाथदादा पाटील यांच्याशी ते कायम संपर्कात राहून चर्चा करत असत. खंडकरी शेतकरी चळवळ व शेती महामंडळ कब्जा आंदोलनातही त्यांचा सक्रिय सहभाग होता.

राज्यात गाजलेल्या विखे-गडाख निवडणूक खटल्यामध्ये ते महत्त्वाचे साक्षीदार होते. ‘पेड न्यूज’संदर्भात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करणारे ते पहिले पत्रकार होते. गरजवंत रुग्णांना वैद्यकीय उपचारासाठी मार्गदर्शन करण्यासाठी ‘आरोग्यदूत’ म्हणूनही ते काम करत होते. शनिशिंगणापूर व शिर्डीतील साईबाबा मंदिरमध्ये भाविकांना सुलभ दर्शन उपलब्ध व्हावे, यासाठी त्यांनी सातत्याने लिखाण केले. तुपे यांनी जिल्हा पत्रकार संघाचे सचिव, जिल्हा पत्रकार संघाच्या पत्रकार भवन प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष, श्रीरामपूर प्रेस क्लबचे कार्यवाह म्हणून त्यांनी काम पाहिले. साहित्यिक शंकर पाटील घेराव आंदोलनाचे नेतृत्वही यांनी केले होते.

 

अशोक तुपे यांच्या निधनाचे वृत्त धक्कादायक आणि दुर्दैवी आहे. आपल्या पत्रकारितेच्या जीवनात ते कायम  सामान्यांच्या सोबत राहिले. नि:स्पृह पत्रकारिता करताना त्यांनी अनेक महत्त्वाच्या प्रश्नांना वाचा फोडली. त्यांचा व्यासंग मोठा होता. विशेषत: शेती, सहकार, पाटपाणी यावर ते नेहमी अभ्यासपूर्ण बोलत व लिहीत. त्यांच्या निधनाने जिल्ह््याची, विशेषत: पत्रकारिता क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. आज ते आपल्यात नसले तरी त्यांचे काम सदैव स्मरणात राहील.

– बाळासाहेब थोरात, महसूल मंत्री

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 23, 2021 1:04 am

Web Title: senior journalist ashok tupe passes away abn 97
Next Stories
1 शंभरी गाठलेल्या महिलेच्या खुब्यावर यशस्वी शस्त्रक्रिया
2 एक बालविवाह थांबवताना दुसराही उघड
3 कुख्यात गुंड अजहर शेखसह साथीदारास जन्मठेप
Just Now!
X