१ ते २१ जानेवारीदरम्यान अर्ज भरण्याची मुदत

पुणे : राज्यात सहायक  प्राध्यापक  होण्यासाठी अनिवार्य असलेली राज्य पात्रता परीक्षा (सेट) येत्या २८ जूनला होणार आहे. सावित्रीबाई फु ले पुणे विद्यापीठामार्फत महाराष्ट्र आणि गोवा राज्यांसाठी घेतल्या जाणाऱ्या या परीक्षेसाठी १ ते २१ जानेवारीदरम्यान ऑनलाइन अर्ज करता येईल. यंदाही परीक्षा ऑफलाइन पद्धतीने होईल.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने सेट परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) मार्गदर्शक  तत्त्वांनुसार ही परीक्षा घेतली जाते. या परीक्षेसाठी एकूण ३०० गुणांच्या दोन प्रश्नपत्रिका असतील. पहिली १०० गुण आणि दुसरी प्रश्नपत्रिका २०० गुणांची असेल. दोन्ही प्रश्नपत्रिकांची परीक्षा एकाच दिवशी होईल. पहिली प्रश्नपत्रिका सर्वासाठी समान असेल. दुसरी प्रश्नपत्रिका निवडलेल्या विषयाची असेल. ३२ विषयांसाठी ही परीक्षा होईल. गेल्या वर्षीच्याच धर्तीवर यंदाची परीक्षा होईल. त्यामुळे पात्रता, विषय, अभ्यासक्रम सारखाच असेल, अशी माहिती सेट विभागाचे समन्वयक  डॉ. बी. पी. कापडणीस यांनी दिली.

नॉन क्रीमीलेअर गटातील विद्यार्थ्यांकडे जाहिरात प्रसिद्ध झालेल्या आर्थिक वर्षांतील वैध प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. आर्थिकदृष्टय़ा मागास गटाचे आरक्षणही या परीक्षेला लागू असेल. आरक्षण आणि विषयाची अचूक निवड करावी. त्यात काही चूक झाल्यास दुरुस्तीसाठी अवधी दिला जातो. मात्र, त्यानंतर दुरुस्ती करता येणार नसल्याने विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक अर्ज भरावा, असेही डॉ. कापडणीस यांनी स्पष्ट केले.