राष्ट्रवादी काँग्रेसचे बीडमधील नेते आणि माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर हे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. पक्षांतर्गत गटबाजीमुळे क्षीरसागर नाराज होते. जयदत्त क्षीरसागर हे बीड विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार असून पाच दशकांपासून जिल्ह्याच्या राजकारणावर त्यांचा दबदबा आहे.

जयदत्त क्षीरसागर यांनी लोकसभा निवडणुकीत महायुतीला पाठिंबा देत राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देण्याचे संकेत दिले होते. एप्रिल महिन्यात लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान जयदत्त क्षीरसागर यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. तेव्हापासूनच क्षीरसागर हे शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा होती. अखेर बुधवारी ते शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. शिवसेना भवन येथे संध्याकाळी पाच वाजता अधिकृतपणे ते शिवसेनेत प्रवेश करतील.

शिवसेनेत प्रवेश करण्यापूर्वी जयदत्त क्षीरसागर यांनी विधानभवनात जाऊन आमदारकीचा राजीनामा दिला

बीड जिल्ह्यात ४० वर्षांपूर्वी दिवंगत केशरबाई क्षीरसागर यांनी प्रस्थापितांचे वर्चस्व कमी करून आपले नेतृत्व प्रस्थापित केले. शिक्षण व सहकारी संस्थांच्या माध्यमातून गावागावात हक्काचा माणूस तयार करून प्रभाव निर्माण केला. विधानसभेच्या सहाही मतदारसंघात क्षीरसागरांनी निर्णायक राजकीय ताकद निर्माण केली होती. २० वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर दिवंगत केशरबाई क्षीरसागर व आमदार जयदत्त क्षीरसागर यांनी पक्षात यावे यासाठी शरद पवार यांना स्वत: क्षीरसागरांच्या घरी धाव घ्यावी लागली होती. गोपीनाथ मुंडे यांच्याकडून राज्यस्तरावर शरद पवार यांना होणाऱ्या विरोधामुळे स्थानिक पातळीवर मुंडेंना अडकून ठेवण्यासाठी पवारांनी क्षीरसागरांना राजकीय ताकद दिली होती. मात्र, गेल्या काही वर्षांपासून राष्ट्रवादीच्या पक्षनेतृत्वाने डावलल्याची भावना क्षीरसागर यांच्या मनात होती. पक्षांतर्गत गटबाजीचा फटका त्यांना बसू लागला होता.

लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या नेत्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्याशी जवळीक साधत क्षीरसागर बंधूंनी भाजपाशी अप्रत्यक्ष राजकीय युतीच केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जाहीर कार्यक्रम घेतल्याने क्षीरसागर भाजपात प्रवेश करतील असे कयास बांधले गेले. मात्र, मुंडे आणि क्षीरसागर हे दोघेही ओबीसी समाजाचे नेते आहेत. त्यामुळे क्षीरसागर यांनी शिवसेनेचा पर्याय निवडून पंकजा मुंडे यांच्यासोबतचा संघर्ष टाळला आहे.