सेवाग्राम विकास आराखडय़ाच्या भूमिपूजनाचा मुहूर्त पुन्हा उत्सुकतेचा ठरत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी अथवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या होकाराच्या प्रतीक्षेत मुहूर्ताचा दिवस लांबत चालला आहे. भाजप नेतृत्वातील राज्य शासनाने सत्तेवर आल्यानंतर सेवाग्राम विकास प्रकल्पास सर्वोच्च प्राधान्य असल्याचे संकेत दिले. लोकसभा व त्यानंतरच्या सर्व निवडणुकांत गांधीवादी वर्धा जिल्हय़ातून काँग्रेसला हद्दपार करण्यात भाजप नेते यशस्वी ठरले. तसा उल्लेख विधानसभेत करणारे जिल्हय़ाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावरच बहुआयामी विकास आराखडा समितीच्या अध्यक्षपदासह अंमलबजावणीची जबाबदारी आली. १७ नोव्हेंबर २०१५ च्या बैठकीत पालकमंत्र्यांनी २६६ कोटी रुपये खर्चाच्या आराखडय़ास मान्यता प्रदान केली. मात्र भूमिपूजनाचा मुहूर्त निघालेला नव्हता. ज्येष्ठ गांधीवादी या प्रकल्पाबाबत उत्सुक असल्याने त्यांनाही हे काम लवकर मार्गी लावण्याची अपेक्षा आहे.

याविषयी विचारणा केल्यावर पालकमंत्री मुनगंटीवार यांनी कार्यआदेशाशिवाय भूमिपूजन होणार नाही, असे स्पष्ट करीत लवकरच काम मार्गी लावण्याची माहिती जून महिन्यात दिली होती. २० जुलैला मुनगंटीवार यांचा वर्धा जिल्हा दौरा ठरला. हा दौरा एक प्रकारे या आराखडय़ास वादग्रस्त करणारा ठरला. जिल्हा प्रशासन व बांधकाम विभागाने पालकमंत्र्यांची आश्रम भेट पाहून याच वेळी भूमिपूजन आटोपण्याची तयारी केली होती. आश्रमवासीयांशी चर्चा करून परत येत असताना भूमिपूजनाच्या जागेवर पाचारण करणाऱ्यांना पालकमंत्र्यांनी धक्काच दिला. माझ्या कार्यक्रमपत्रिकेत हा कार्यक्रम आहे का, केंद्र राज्य पुरस्कृत हा प्रकल्प माझ्या हस्ते सुरू करण्याची अपेक्षा कशी ठेवता, मी भूमिपूजन करण्याची परवानगी दिली काय, अशा प्रश्नांची सरबत्ती वरिष्ठ अधिकाऱ्यांना करीत संतप्त झालेल्या पालकमंत्र्यांनी परिसर सोडला. विभागीय आयुक्त अनुप कुमार यांनाही त्यांनी जाब विचारत ‘मुहूर्त’ ठेवल्याबद्दल नाराजी नोंदविली. प्रसारमाध्यमांपुढेच हे प्रकरण घडल्याने प्रशासनाची अडचण झाली.

Farmers, Farmers news,
प्रकल्प घोषणेपूर्वी शेतकऱ्यांना विश्वासात घ्यावे
onion, Nashik, onion auction,
विश्लेषण : नाशिक जिल्ह्यात कांद्याचे लिलाव बंद राहण्याचे कारण काय? परिणाम काय?
Overthrow the tyrannical government and bring your rightful government at the centre says aditya thackeray
वृद्ध शेतकऱ्याने केली ईडी अन् ५० खोक्यांवर बोलण्याची ‘फर्माईश’; आदित्य ठाकरेंनी केले असे की…
repair work of creek bridge on uran panvel road completed
उरणच्या खाडीपूल दुरुस्तीचे काम पूर्ण; ‘हाइट गेट’ हटवण्याची प्रतीक्षा; चार गावांतील हजारो नागरिकांना दिलासा

याच पाश्र्वभूमीवर प्रशासन नव्या मुहूर्ताच्या तयारीला लागले. ९ ऑगस्ट या क्रांतिदिनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कार्यक्रम करण्याचे घाटत असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या गांधीवादी प्रकलचे भूमिपूजन करण्यासाठी राज्य शासन निमंत्रित करीत असल्याची चर्चा सुरू झाली. पुन्हा अनिश्चिततेचे सावट पसरले. या संदर्भात राज्य शासनाची भूमिका मांडताना मुनगंटीवार म्हणाले, सेवाग्राम विकास आराखडय़ाच्या बांधकामाचे भूमिपूजन करण्यास वेळ देण्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयाकडे विनंती केली आहे. परंतु अद्याप उत्तर आलेले नाही. ९ किंवा १६ ऑगस्टला भूमिपूजन करण्याचा विचार सुरू आहे. येत्या काही दिवसांत कार्यक्रम निश्चित होईल, अशी खात्री मुनगंटीवार यांनी दिली. ९ ऑगस्ट या क्रांतिदिनीच मुंबईत मराठा मूक मोर्चाचे आयोजन होणार असल्याने मुख्यमंत्र्यांची उपस्थिती प्रश्नांकित ठरत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मते या दिवशी मुख्यमंत्री मुंबईतच थांबण्याचा निर्णय घेऊ शकतात. त्यामुळे १६ ऑगस्टला कार्यक्रम होण्याची शक्यता आहे. भूमिपूजन आटोपून हे काम मार्गी लावण्याची धडपड करण्यामागे महात्मा गांधी यांच्या दीडशेव्या जयंतीपर्व उपक्रमाचे निमित्त आहे. सेवाग्राम विकास आराखडय़ाच्या प्रशासकीय निर्णयातच तसा उल्लेख झालेला आहे. २ ऑक्टोबर २०१९ रोजी महात्मा गांधी यांच्या जयंतीस दीडशे वर्षे पूर्ण होत असल्याने त्यापूर्वी त्वरित अंमलबजावणी करावी, या स्पष्ट निर्देशामुळे प्रकल्पाबाबत लगीनघाई आहे. मात्र मुहूर्ताचेच त्रांगडे दूर होत नसल्याची सध्याची स्थिती आहे.

सेवाग्राम विकास आराखडय़ाची वैशिष्टय़े

  • सेवाग्राम- पवनार- वर्धा हा परिसर जोडणारे रस्ते प्रशस्त व सुशोभित करणे.
  • अस्तित्वात असणाऱ्या उद्यानांचा पर्यावरणीय विकास व अभ्यागतांना सुविधा.
  • पवनार आश्रम परिसर व धाम नदीकाठ सुशोभित करणे. आश्रमापर्यंत पादचारी मार्ग, बंधाऱ्याचे वनीकरण, पर्यटक सुविधा.
  • सेवाग्राम आश्रम परिसरातील आठ एकर जागेवर सर्व सुविधायुक्त एक हजार आसन क्षमतेचे सभागृह.
  • आश्रम सभोवताली संरक्षक भिंत.
  • आश्रमवासीयांसाठी निवासी कॉटेज, अभ्यास केंद्र, वाचनालय बांधकाम.
  • खादी व हस्तकला विक्री केंद्र.
  • नई तालीम शाळेचा विस्तार, पर्यटकांसाठी वाहनतळ.
  • नागपूर-सेवाग्राम मार्गावर सहा माहिती केंद्रांची स्थापना.
  • सेवाग्राम, वर्धा व पवनार परिसरातील ऐतिहासिक स्थळांचा विकास. या वास्तूंना जोडणारा ‘हेरिटेज ट्रेल’ मार्ग. रेल्वे स्थानकावर सुधारणा, दिल्ली गेट व परिसर वारसा संवर्धन. सेवाग्राम या गावात पायाभूत सुविधा.