धुळे जिल्ह्यातील पाच वर्षांच्या मुलीवर बलात्कार झाल्याची घटना ताजी असतानाच जळगाव जिल्ह्यातील कळमसरे या गावात असलेल्या जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाने ३ री आणि ४ थीत शिकणाऱ्या अनेक मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पीडित मुलींचे पोलीस स्थानकात इन कॅमेरा जबाब घेण्यात आले आहेत. नराधम जगदीश पाटील या शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान हा शिक्षक फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

संतप्त पालकांनी आज शाळेला कुलूप ठोकले. या प्रकारामुळे शाळेतील इतर शिक्षकांना बाहेर पटांगणात वर्ग भरवून मुलांना शिकवावे लागले. दरम्यान, संबंधित शिक्षकास निलंबित करण्यात आले असून बडतर्फीचा प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना प्रभारी गटविकास अधिकारी एस. डी. वायाळ यांनी दिल्या आहेत. या शाळेत महिला शिक्षकांची नियुक्ती करण्याची मागणीही पालकांकडून करण्यात आली आहे. माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी या प्रकरणी मोबाईलवरून सरपंच व पालकांशी चर्चा केली.

पोलिसांच्या माहितीनुसार, नराधम जगदीश पाटील हा अमळनेर तालुक्यातील मारवाडचा रहिवासी आहे. तो जिल्हा परिषदेच्या कन्या शाळेत शिक्षक आहे. गेल्या काही महिन्यांपासून ३ री आणि ४ थीच्या विद्यार्थिनींशी तो अश्लील चाळे करत होता. याबाबत घरी सांगितले तर याद राखा असे सांगून त्याने या मुलींना धमकावले होते. शिक्षकांना घाबरलेल्या मुलींनी घरी काहीही सांगितले नाही त्यामुळे या शिक्षकाची हिंमत वाढली. तो मुलींना अश्लील चित्रफिती दाखवत असे. तसेच माझे कुणीही काहीही करु शकत नाही मी कुणालाच घाबरत नाही असे सांगत धमकावत असे.

एकदा एका मुलीने याबाबत वाच्यता केली तेव्हा तिला छड्या मारून त्याने शिक्षा केली. तसेच त्याने विद्यार्थिनींचा लैंगिक छळ त्याने सुरुच ठेवला. हा त्रास असह्य झाल्याने काही विद्यार्थिनींनी धाडस करून घडला प्रकार घरी सांगितला. त्यानंतर संतप्त पालकांनी शाळेत येत या प्रकरणाचा जाब विचारला. पालक शाळेत आल्यानंतर जगदीश पाटील फरार झाला. पालकांनी मारवाड पोलीस ठाणे गाठले आणि पोलीस निरीक्षक अवतार सिंग यांना याबाबत माहिती दिली.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पीडित मुलींचे जबाब इन कॅमेरा नोंदवून घेण्यात आले. दक्षता समिती सदस्या आणि वकिलांसमोर पीडित मुलींचे जबाब नोंदवले गेले. त्यानंतर जगदिश पाटील विरोधात पोस्को बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये विनयभंग, जीवे मारण्याची धमकी यासारखे चार गुन्हे दाखल करण्यात आले. पीएसआय जिजा गुटे, पीएसआय कांचन काळे, पीएसएआय सुनीता कोळपकर हे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत असे समजते आहे.