करोनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरचा शाही दसरा रद्द करण्यात आला आहे. वादळी वारा असो किंवा मुसळधार पाऊस असो कोल्हापुराताल्या ऐतिहासिक दसरा चौकात दरवर्षी दसरा मोठा उत्साहात साजरा केला जातो. मात्र करोना संसर्ग वाढू नये म्हणून आणि लोकांनी यावर्षी साधेपणानेच हा सण साजरा करावा म्हणून दसरा साजरा करण्यात येणार नाही. श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी दौलत देसाई आणि महापालिका आयुक्त कादंबरी बलकवडे यांनी शाही दसरा यावर्षी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

कोल्हापूरमध्ये करोनाचे रुग्ण वाढत होते. सध्या प्रमाण कमी झालं असलं तरी सुरक्षा आणि खबरदारी घेणं गरजेचं आहे. जिल्ह्यातले आत्तापर्यंतचे सगळे सार्वजनिक सण व समारंभ रद्द करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील करोना संसर्गाला आळा बसावा म्हणून जिल्हा प्रशासन, जिल्हा आरोग्य विभाग, सीपीआरसह सगळे शासकीय विभाग कसोशीचे प्रयत्न करत आहेत. याचाच एक भाग म्हणून श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यंदाचा दसरा रद्द करण्यात यावा अशा सूचना दिल्या होत्या.

दसरा चौकात होणाऱ्या शाही दसऱ्याला दरवर्षी लाखो लोक उपस्थित राहून सोनं लुटत होते. मात्र यंदा हा सोहळा साजरा होणार नाही. करोना संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यात विविध प्रयत्न केले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून यावर्षीचा शाही दसरा रद्द करण्यात आला आहे. श्रीमंत शाहू छत्रपती शाहू महाराज यांनी केलेल्या सूचनेनुसार दसरा सोहळा रद्द करण्यात आल्याचं जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी स्पष्ट केलं.