धूलिवंदन निमित्ताने सगळीकडे रंगाची उधळण सुरू असताना राज्यात राजकीय वर्तुळातही गुप्त भेटीचे रंग उधळले जात आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या चर्चा सुरू आहे ती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीची. या भेटीवरून तर्कविर्तकांना उधाण आलं आहे. तर राष्ट्रवादीकडून भेटीचं हे वृत्तच फेटाळून लावण्यात आलं आहे. अशातच भाजपाच्या आमदाराने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा एक व्हिडीओ ट्विटरवरून शेअर करत सस्पेन्स वाढवला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी अहमदाबादमध्ये अमित शाह यांची भेट घेतल्याचं समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळातील अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या. २६ मार्च रोजी अहमदाबादमधील एका फार्म हाऊसवर शरद पवार आणि अमित शाह यांची भेट झाल्याचं वृत्त ‘भास्कर’च्या गुजराती दैनिकाने दिलं होतं. या वृत्तानंतर राज्यात या भेटीबद्दल चर्चा सुरू झाली. त्याचबरोबर सत्ताबदलाबद्दलही बोललं जाऊ लागलं. हे वृत्त राष्ट्रवादी काँग्रेसनं मात्र फेटाळून लावलं होतं.

आणखी वाचा- “आता तरी रहस्य कथेचा शेवट करा; काही गोष्टी वेळेबरोबर स्पष्ट झाल्या पाहिजे”

धूलिवंदनाच्या निमित्ताने (२९ मार्च) या भेटीची चर्चा रंगलेली असताना भाजपा आमदार राम सातपूते यांनी देवेंद्र फडणवीस यांचा जुना व्हिडीओ शेअर केला. विधानसभेत भाषण करतानाचा हा व्हिडीओ आहे. सत्तांतर झाल्यानंतर फडणवीस यांनी महाविकास आघाडीला इशारा दिला होता. ‘मेरा पाणी उतरता देख मेरे किनारे पर घर मत बसा लेना, मैं समंदर हूँ लौटकर वापस आऊंगा’ असं फडणवीस म्हणाले होते.

‘त्या’ भेटीवर राष्ट्रवादीची भूमिका काय?

शरद पवार-अमित शाह यांच्या गुप्त भेटीचं वृत्त राष्ट्रवादी काँग्रेसने लगेच फेटाळून लावलं होतं. राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक म्हणाले होते की, “शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल हे दोघेही अहमदाबादमधून थेट मुंबईला आले, ते कोणालाही भेटले नाहीत. एका गुजराती दैनिकाने पवार यांनी अमित शाह यांची भेट घेतल्याची बातमी दिली आहे. हे भाजपाचं षडयंत्र आहे. शरद पवार यांनी अमित शाह यांची भेट घेतल्याची बातमी निव्वळ अफवा आहे,” असं मलिक यांनी म्हटलं होतं.

आणखी वाचा- शरद पवार-अमित शाह भेट?; राष्ट्रवादी म्हणते नाही, शाह म्हणाले…

संजय राऊत काय म्हणाले?

“मी ठामपणे सांगतो अशी काही गुप्त भेट वगैरे अजीबात झालेली नाही. आता तरी रहस्य कथेचा शेवट करा. अफवांची धुळवड थांबवा. हाती काहीच लागणार नाही,” असं ट्वीट राऊत यांनी केलं असून, भाजपावरही निशाणा साधला आहे.

अमित शाह काय म्हणाले होते?

एकिकडे राष्ट्रवादी काँग्रेसनं भेटीचं वृत्त फेटाळून लावलं, तर अमित शाह यांनी सूचक विधान करत उत्सुकता ताणून ठेवली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काल दिलेल्या प्रतिक्रियेनं भेटीचा सस्पेन्स काय आहे. दिल्लीत शाह यांनी माध्यमांशी संवाद साधला होता. त्यावेळी त्यांना पवारांसोबतच्या भेटीबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर “सगळ्याच गोष्टी सार्वजनिकपणे केल्या जात नाहीत”, असं उत्तर शाह यांनी दिलं होतं.