शरद पवार. विरोधकांनासोबत घेऊन सन्मान देऊन महाराष्ट्राच्या राजकारणात ज्यांनी आपलं वर्चस्व सिद्ध असं व्यक्तिमत्व. गेली पन्नास वर्ष शरद पवार राजकीय जीवनात वावरत आहेत. त्यांच्या विषयीचे अनेक किस्से ऐकायला मिळतात. विशेषतः पवार आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यातील मैत्री अवघ्या महाराष्ट्रालाच माहिती होती. तर ही गोष्ट आहे शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांनी सुरू केलेल्या आंतरराष्ट्रीय मासिकाची… बाळासाहेबांनी ‘मार्मिक’ मासिक सुरू केलं हे कुणीही सांगेल. पण, शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांनी आंतरराष्ट्रीय मासिक सुरू केलं होत. नाव होत राजनीती!

आणखी वाचा- विधानसभेतून बाहेर काढणाऱ्या मार्शलला शरद पवार म्हणाले, आता आमदार होऊनच येणार…

घटना आहे १९६० मधील. ‘फ्री प्रेस जर्नल’मध्ये बाळासाहेब ठाकरे हे व्यंगचित्रकार म्हणून नोकरी करायचे. पण, अचानक त्यांनी ही नोकरी सोडली. त्यानंतर बाळासाहेबांनी कधी नोकरी केली नाही. पण शरद पवार, भा. कृ. देसाई, शशीशेखर वेदक यांच्यासोबत एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं मासिक सुरू केलं होतं. (भा.कृ. देसाई हे रामकृष्ण बजाज यांचे सचिव होते. त्याचबरोबर ‘शिवसेने’च्या स्थापनेत बाळासाहेबांसोबत वैचारिक बैठका त्यांनी घेतल्या होत्या. त्यांचं मराठी आणि इंग्रजी भाषेवरही चांगल प्रभुत्व होतं.) बाळासाहेबांसह चौघांनी मासिक सुरू करण्याचा निर्णय पक्का केला.

आणखी वाचा- Birthday Special: बारामती ते दिल्ली व्हाया मुंबई… जाणून घ्या शरद पवारांबद्दलच्या १२ खास गोष्टी

मासिकात काय असावं. नसावं. यासाठी चर्चा बैठका सुरू झाल्या. अखेर मासिकाच नाव ठरलं, राजनीती. मासिकाच्या मार्केटिंग, डिझाईनपासून सगळ्या गोष्टी निश्चित झाल्या. मासिकाचा पहिला अंक जवळपास पूर्ण झाला आणि बाळासाहेबांनी तिघांजवळ एक आयडिया बोलून दाखवली. बाळासाहेबांच्या एका भगिनीच्या अंगात यायचं आणि त्या जे सांगतील ते खरं ठरत असं मानल जायचं, हे बाळासाहेबांनी शरद पवार इतर दोन सहकाऱ्यांना सांगितलं. मग मासिक कधी प्रकाशित करायचं यांचा निर्णय घेण्यासाठी चौघेही बाळासाहेबांच्या त्या भगिनीकडं गेले.

अंक प्रकाशित करण्यासाठी त्यांनी तारीख सांगितली. त्याचबरोबर पहिली पत्रिका सिद्धिविनायकासमोर ठेवण्याचा सल्ला त्यांनी दिला. विशेष म्हणजे मासिकाला उज्ज्वल भवितव्य असून, एकही प्रत बाजारात शिल्लक राहणार नाही, असंही त्यांनी सांगितलं. दिलेल्या सल्ल्याच पालन करत चौघांनी प्रत्येक गोष्ट केली. त्यानंतर बाजारातील कोणत्याही स्टॉल मासिक दिसत नव्हतं. मग चौघांनी चौकशी केली. तर कळल की, त्या मासिकाची कुणीच मागणी न केल्यानं त्या विक्रेत्यांच्या कपाटात पडून आहेत. त्यानंतर चौघांना “बाजारात एकही प्रत राहणार नाही,” या भाकिताचा अर्थ कळला. हा किस्सा खुद्द शरद पवार यांनीच आपल्या राजकीय आत्मचरित्रात सांगितला आहे.