बिहार विधानसभा निवडणुकीत देशातील राजकीय बदलाचा पहिला संकेत नक्की मिळेल, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लालूप्रसाद यादव आणि नीतिशकुमार यांच्यामागे शक्ती उभी करणार असल्याचे सांगितले. तिसऱ्या आघाडीची चाचपणी ते काही दिवसांपासून करत होते.
नव्या राजकीय समीकरणाबाबत पवार म्हणाले, ‘बिहार म्हणजे महात्मा गांधींच्या ‘चले जाव’ आंदोलनाच्या पाश्र्वभूमीला बळ देणारा प्रदेश. याच प्रदेशातून जयप्रकाश नारायण यांनी चळवळीला सुरुवात केली. बिहारमधून मंडल आयोगासारखा परिवर्तनाची नांदी ठरणारा सकारात्मक पर्याय देशासमोर आला. त्यामुळे बिहार म्हणजे देशाला नवी राजकीय दृष्टी देणारा प्रदेश आहे. त्यामुळे देशातील राजकीय बदलाचा पहिला संकेत याच प्रदेशातून नक्की मिळेल. त्यामुळेच लालूप्रसाद यादव आणि नीतिशकुमार यांच्या पाठीशी सर्व स्तरांतून एकत्रित पाठबळ उभे करण्याचा निर्णय घेतला आहे.’
शहरातील शासकीय विश्रामगृहावर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी त्यांनी मराठवाडा आणि महाराष्ट्रातील दुष्काळाबरोबरच बिहारमधील निवडणुका आणि त्यासाठी सुरू असलेल्या तिसऱ्या आघाडीच्या प्रयत्नांचाही उल्लेख केला. देशाला नवी राजकीय दृष्टी हवी असेल तर अशी दृष्टी देणारे नव्हे, तर राजकीय शहाणपण म्हणजे काय, याची प्रचिती देणारे म्हणजे बिहार राज्य आहे. देशात नक्कीच पुढील काळात वर्तमान राजकीय समीकरणांना धक्का देण्याची ताकद या प्रदेशात आहे. त्यासाठी आम्ही सर्वानी बिहारमध्ये लालूप्रसाद यादव आणि नीतिशकुमार यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला असल्याचे पवार यांनी सांगितले. या वेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी सभागृहात सुसंवादाचे वातावरण निर्माण होऊ देत नसल्याचा आरोप केला. संसदीय लोकशाहीत चर्चा व्हायला हवी. सभागृहातील चच्रेमुळे जनतेच्या हिताचे निर्णय घेणे सोयीचे होते. मात्र मधल्या काळात विरोधी पक्षाला अजिबात चच्रेत सहभागी न होण्याची संधी दिली गेलेली नाही. त्यामुळे सभागृहात कोणताच सुसंवाद निर्माण होऊ शकला नाही. हा सुसंवाद निर्माण होण्यासाठी पंतप्रधान मोदींनी कधीही सकारात्मक प्रयत्न केल्याचे दिसून आले नाही, असेही पवार म्हणाले.
सध्या ओढावलेल्या दुष्काळाचे खापर मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर फोडत आहेत. त्यांच्याकडे असलेल्या या अगाध ज्ञानाची मला कीव वाटते. पाऊस आला नाही, अतिवृष्टी झाली यालाही राष्ट्रवादीच जबाबदार आहे, असे ते मानतात. दुष्काळाचे राजकारण करण्यापेक्षा सामान्य माणसाच्या हिताचे निर्णय त्यांनी घ्यायला हवेत, असेही पवार यांनी सांगितले.
शेती उद्ध्वस्त झाली आहे. पशुधनावर विपरीत परिणाम होत आहेत, अशा कालावधीत राज्य आणि केंद्र सरकारने अद्याप कोणतेही ठोस निर्णय घेतलेले नाहीत. याबाबत त्यांचे काहीच स्वच्छ धोरण नाही. त्यामुळे यासाठी राज्य आणि मध्यवर्ती सरकारकडे आपण हा दौरा संपल्यानंतर आग्रह धरणार असल्याचे त्यांनी सांगितले. उस्मानाबाद, बीड, लातूर, परभणी या परिसरात वाईट अवस्था आहे. येथे पाऊस नसल्यामुळे वरचेवर परिस्थिती बिकट होत चालली आहे. बाहेरून पाणी आणण्यावर मर्यादा आहे. त्यामुळे शेतीबरोबरच काही पर्यायी व्यवसाय या भागात उभे करता येतील का, यावर विचार करायला हवा, असेही त्यांनी या वेळी सांगितले.