अशोक तुपे, श्रीरामपूर

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार कर्जत-जामखेड मतदारसंघातून लढणार असल्याने त्यांना शह देण्याकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतला आहे.

मुख्यमंत्र्यांनी आमदार व पालकमंत्री राम शिंदे यांची उमेदवारी जाहीर करून त्यांना पुढे मंत्री तर करूच पण जेवढे जास्त मताधिक्य तेवढे चांगले खातेही देऊ, असे वक्तव्य करत शिंदे यांच्या विजयासाठी आतापासूनच प्रयत्न सुरू केले आहेत. तसेच जामखेडसाठी पाणीपुरवठा योजना मंजूर केल्याचे जाहीर करून तसा आदेशही व्यासपीठावर दाखविण्यात आला.

मावळची पुनरावृत्ती कर्जत-जामखेडमध्ये करण्याची भाजपची योजना आहे.  लोकसभा निवडणुकीत मावळ मतदारसंघात अजित पवार यांचे पुत्र पार्थ यांचा पराभव झाला. रोहित पवार हे शरद पवार यांचे अलीकडच्या काळात एकदम निकटवर्तीय मानले जातात. विविध कार्यक्रमांमध्ये रोहित पवारांबरोबर असतात. पवारांनी जाहीरपणे रोहित यांचे कौतुक केले आहे. या पाश्र्वभूमीवर कर्जत-जामखेड मतदारसंघात रोहित यांची निवडणूक राष्ट्रवादीने प्रतिष्ठेची केली आहे. रोहित यांचे मतदारसंघांमध्ये दौरे आणि संपर्कही वाढविला आहे.

कर्जत-जामखेडमध्ये पालकमंत्री राम शिंदे यांच्यापुढे रोहित पवार यांच्या उमेदवारीमुळे आव्हान उभे ठाकले आहे. शिंदे यांच्यासाठी ही लढत सोपी नसल्याचे भाजप नेत्यांच्या लक्षात आले आहे. शिंदे यांच्याऐवजी अन्य दुसऱ्याला उमेदवारी द्यावी, अशी चर्चा पक्षाच्या पातळीवर झाली. पण राम शिंदे यांना उमेदवारी नाकारता येणार नाही. शिंदे यांनाच पुन्हा उमेदवारी देऊन त्यांना निवडून आणण्याचे डावपेच आखले जात आहेत.

नगर जिल्ह्य़ात महाजनादेश यात्रा आली असता राधाकृष्ण विखे-पाटील,  आमदार शिवाजी कर्डिले, आमदार मोनिका राजळे, आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या उमेदवारीचे संकेत दिले. मात्र सभेत भाषणाची संधी कुणालाही देण्यात आली नाही. जामखेडमध्ये मात्र पालकमंत्री राम िशदे यांना भाषण करण्याची संधी देण्यात आली. अन्य नेत्यांना भाषणाची संधी मिळाली नाही. केवळ मुख्यमंत्र्यांनी भाषणात केलेल्या नामोल्लेखापुरतेच ते होते.

याच सभेत मुख्यमंत्र्यांनी राम शिंदे यांची उमेदवारी जाहीर केली. चांगल्या मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन केले. तसेच जेवढे जास्त मताधिक्य तेवढे चांगले खाते देण्याचे जाहीर करून शिंदे यांना जास्तीत जास्त मते मिळावीत, अशी व्यवस्था केली. मुख्यमंत्र्यांच्या या खेळीचा कितपत उपयोग होतो याबाबत निकालानंतरच समजेल, पण शिंदे यांचे मंत्रिपद कायम ठेवणार हा संदेश मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना २००९ मध्ये सोनिया गांधी यांनी नांदेडच्या सभेत त्यांनाच पुन्हा मुख्यमंत्री करणार, असे जाहीर केल्याने जिल्ह्य़ात त्याचा चांगला उपयोग झाला होता. यातून जिल्ह्य़ात तेव्हा काँग्रेसला चांगल्या जागा मिळाल्या होत्या. मुख्यमंत्र्यांनी शिंदे यांना महत्त्व दिल्याने त्याचा राजकीय लाभ त्यांना होऊ शकतो. यामुळेच मुख्यमंत्र्यांनी ही खेळी केल्याचे मानले जाते. पाणीपुरवठा योजनेच्या मंजुरीच्या निमित्ताने तालुक्यात पाणी आणले हा प्रचार करण्यास शिंदे यांना संधी मिळाली आहे.

नगर जिल्ह्य़ातील सर्व १२ जागाजिंकण्याचे उद्दिष्ट अलीकडेच भाजपवासी झालेल्या राधाकृष्ण विखे-पाटील यांनी ठेवले आहे. या दृष्टीने त्यांनी नियोजनही सुरू केले आहे. पारंपरिक विरोधक मधुकर पिचड आणि त्यांच्या पुत्राला भाजपमध्ये आणण्यात विखे-पाटील यशस्वी झाले. पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमात पिचड यांनीच विखे-पाटील यांनी हा मार्ग दाखविल्याचे कबूल केले होते. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना राजकीय शह देण्याचे विखे यांचे लक्ष्य आहे. संगमनेर या थोरात यांच्या पारंपरिक मतदारसंघात विखे मुसंडी मारतात का, हा खरा प्रश्न आहे.