राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी संजय राऊत यांना दिलेल्या मुलाखतीचा तिसरा आणि शेवटचा भाग आज प्रदर्शित झाला. या मुलाखतीमध्ये पवारांनी फडवणीस यांनी केलेले आरोप, नरेंद्र मोदींच राजकारण, विरोधी पक्षाची भूमिका अशा अने गोष्टींवर भाष्य केलं आहे. पवारांनी ‘सामना’ला नुकतीच एक विशेष मुलाखत दिली असून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ‘सामना’चे कार्यकारी संपादक म्हणून ही मुलाखत घेतली आहे. शनिवारी प्रदर्शित झालेल्या पहिल्या भागामध्ये पवारांनी करोनापासून ते राज्यातील राजकारणासंदर्भात वेगवेगळ्या विषयांवर भाष्य केलं. तर दुसऱ्या भागामध्ये पवारांनी प्रामुख्याने राज्यातील राजकारणाबरोबरच देशातील राज्यकारणावर भाष्य केलं. आजच्या मुलाखतीमध्ये पवार विरोधकांचा समाचार घेणार की भविष्यातील भूमिका स्पष्ट करणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं होतं. सकाळी नऊ वाजता या मुलाखतीचा शेवटचा भाग प्रदर्शित झाला.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वगळता पहिल्यांदाच राऊत यांनी संपादक म्हणून ठाकरे कुटुंबाबाहेरील एखाद्या व्यक्तीची अशी प्रकट मुलाखत घेतली आहे. एक शरद, सगळे गारद…! अशा मथळ्याखाली ही मुलाखत प्रदर्शित करण्यात आली.