ज्यांच्या हातात देशाची सूत्रे आहेत, त्यांचा संविधानावर विश्वास नाही, संधी मिळेल तेव्हा संविधानाचे उल्लंघन करण्याचा प्रयत्न केला जात आहे. संविधान बदलणे हा भाजपचा छुपा अजेंडा आहे. देशाच्या संविधानावरची ही आक्रमणे थोपवली गेली पाहिजेत, असे मत राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केले. ते रोहा येथे राष्ट्रवादी महिला आघाडीतर्फे आयोजित संविधान बचाव देश बचाव कार्यक्रमात बोलत होते.

या वेळी राष्ट्रवादीच्या महिला राष्ट्रीय अध्यक्षा फौजीया खान, राष्ट्रीय सरचिटणीस सुनील तटकरे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार विद्या चव्हाण, सुरेश लाड, अनिकेत तटकरे, आदिती तटकरे उपस्थित होते. संविधानाची शपथ घ्यायची आणि त्याची प्रतारणा करायची ही भाजप सरकारची कार्यपद्धती आहे. संविधान बदलण्याची भाषा करणाऱ्यांना पाठीशी घातले जात आहे. भाजप सरकार हे संविधानविरोधी आहे, असा आरोपही त्यांनी या वेळी केला.

महागाई, भ्रष्टाचार, अत्याचार आणि राम मंदिर यावर पवार यांनी अनोख्या शैलीत टीका केली. भाजप सरकार संविधानविरोधी आहे. संविधान बदलणे हा त्यांचा मूळ अजेंडा आहे. त्यामुळे संविधानावर होणारे आघात करणाऱ्यांना थोपविले गेले पाहिजे, असे मत त्यांनी या वेळी मांडले.

भाजप सरकारच्या काळात कुठलाही घटक समाधानी नाही. सरकारची धोरणे जनसामान्यांच्या विरोधी आहेत. महागाई प्रचंड वाढली आहे. गॅसचे दर हजारावर पोहोचले आहेत. पेट्रोल आणि डिझेल दर वाढले आहेत. सरकारच्या आत्मविश्वासाचा फुगा फोडण्याची वेळ आली असल्याचे मत या वेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केले.

सत्तर वर्षांच्या राजवटीत आजवर कुठल्याही सरकारने संविधानाची चौकट मोडण्याचे काम केले नाही. सार्वभौम विचारही सोडला नाही. पण धर्माच्या नावाखाली आता विचारांचे ध्रुवीकरण सुरू झाले आहे. संविधान धोक्यात आणण्याचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे या ध्रुवीकरणाला संघटित होऊन थोपविण्याची वेळ आली असल्याचे मत यावेळी राष्ट्रीय सरचिटणीस सुनील तटकरे यांनी या वेळी व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला आदिती तटकरे प्रास्ताविक केले, तर राष्ट्रीय अध्यक्ष फौजीया खान यांनी संविधान बचाव उपक्रमामागचा उद्देश विशद केला.

आ. अवधूत तटकरे व अनिल तटकरे यांची कार्यक्रमाला पाठ

राष्ट्रवादी महिला काँग्रेसतर्फे संविधान बचाव बेटी बचाव कार्यक्रम रोहा येथे आयोजित केला होता. या कार्यक्रमाला राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील, पक्षाच्या राष्ट्रीय महिलाध्यक्ष फौजिया खान उपस्थित होते. राष्ट्रवादीचे अध्यख शरद पवार उपस्थित असतानाही विद्यमान आ. अवधूत तटकरे व माजी आ. अनिल तटकरे यांनी पाठ फिरवली असल्याने तटकरे कुटुंबातील वाद अजून मिटलेला नाही अशी चर्चा दबक्या आवाजात सुरू होती.

शिवसेना माजी जिल्हाप्रमुख पुन्हा स्वगृही

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी सोडून शिवसेना पक्षात प्रवेश केलेले प्रकाश देसाई अडीच वर्षांने पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत रोहा येथे जाहीर प्रवेश केला आहे. शिवसेनेत त्यांनी अडीच वष्रे जिल्हाप्रमुख पद भूषविले होते. मात्र पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याने आत परतीचे दोर कापले गेले असल्याचेही प्रवेश करताना सुनील तटकरे यांनी सांगितले आहे.

मनुस्मृती आणि ईव्हीएम मशीनचे दहन

या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे मनुस्मृती आणि ईव्हीएम मशीनचे दहन करण्यात आले. या वेळी संविधान बचाव, ईव्हीएम हटाव देश बचाव अशा घोषणा महिला कार्यकर्त्यांनी दिल्या.