शरद पवार यांचा आरोप; ‘मिशेलवर दबाव, आणीबाणीसदृश परिस्थिती’

पुन्हा सत्ता मिळेल की नाही याची खात्री नसल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेच्या गैरवापराचा अतिरेक करून विरोधकांना अडचणीत आणत आहेत. हेलिकॉप्टर खरेदी गैरव्यवहारातील आरोपी मिशेलने घेतलेले सोनिया गांधी यांचे नाव हा असाच प्रकार असावा. मिशेलने विशिष्ट व्यक्तीचे नाव घ्यावे, यासाठी दबाव आणला गेला असावा, त्यामागे कटकारस्थान असावे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी केला.

आपल्या ५२ वर्षांच्या संसदीय कारकिर्दीत सत्तेचा असा गैरवापर आपण प्रथमच पाहात आहोत. सर्वोच्च न्यायालय, रिझव्‍‌र्ह बँक, सीबीआय यांसारख्या घटनात्मक संस्थांवर केंद्र सरकारकडून होणारे हल्ले, त्यांच्या कामात होणारे हस्तक्षेप, विरोधकांना नामशेष करण्याचा प्रयत्न हे प्रकार म्हणजे देशात आणीबाणीसदृश परिस्थिती निर्माण करण्यासारखेच आहे, असाही आरोप पवार यांनी केला. देशापुढे निर्माण झालेल्या या संकटाबाबत संसदेत सर्व विरोधी पक्ष चर्चा करण्यासाठी आग्रही असतील, असेही पवार म्हणाले. पवार रविवारी नगरमध्ये पत्रकारांशी बोलत होते.

देशात अनेक सरकारे आली, पंतप्रधान झाले, परंतु त्यांनी कधी विरोधकांना अडचणीत आणण्यासाठी सत्तेचा गैरवापर केल्याचे आपल्या पाहण्यात नाही असे नमूद करून पवार म्हणाले, ‘‘देशावर आणीबाणी लादण्याची किंमत काँग्रेसलाही चुकवावी लागली, परंतु काँग्रेस पुन्हा सत्तेवर आल्यावर आणीबाणीबद्दल दिलगिरीही व्यक्त केली. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदी यांनी निवडणूक प्रचारात संरक्षणविषयक गैरव्यवहारातील परदेशी लोकांना पकडून आणले जाईल, असे सांगितले. नंतर हेलिकॉप्टर गैरव्यवहारात मिशेलला अटक केली.’’ ‘मिशेलमामा’ आता बोलणार, काही लोकांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असे मोदी म्हणाले होते. त्यानंतर आता सोनिया गांधी यांचे नाव पुढे आले. कोणाचा मुलगा पंतप्रधान होणार हे सर्व मोदी दोन-तीन महिन्यांपासून सांगत होते. सत्तेचा गैरवापर हा कोणत्या पातळीवर गेला आहे, त्याचा अतिरेक पाहावयास मिळत आहे, अशी टिप्पणी पवार यांनी केली.

शेतकऱ्यांबद्दल सहानूभूती नाही!

तीन राज्यांतील निवडणूक निकालानंतर पुन्हा सत्ता मिळेल की नाही, याची खात्री नसल्याने, पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी हा गैरवापर होताना दिसतो आहे. निवडणुकांनंतर मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ येथील राज्य सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफीचा धाडसी निर्णय घेतला, त्याबद्दल तेथील राज्यांना केंद्र सरकारने मदत करण्याऐवजी, आर्थिक पाठबळ देण्याऐवजी हे ‘लॉलिपॉप’ आहे, अशी खिल्ली मोदींनी उडवली. याचा अर्थ केंद्र सरकार शेतकऱ्यांना सहानुभूती दाखवत नाही, अशी टीकाही पवार यांनी केली.

मी अव्यवहार्य राजकारण करत नाही!

तीन राज्यांतील निवडणुकांनंतर अनेकांची पंतप्रधान होण्याची इच्छा बळावल्याने विरोधकांची महाआघाडी होण्यात अडचणी जाणवत आहेत का, या प्रश्नावर शरद पवार म्हणाले, की संसदेत तर अशी काही चर्चा नाही. पंतप्रधानपदासाठी राहुल गांधी यांचे नाव नाही, काही जणांचे नाव घेतले जाते तसे माझे नाव घेतले जात असले तरी अव्यवहार्य राजकारण मी करत नाही. कोणत्याही विरोधी पक्षांमध्ये अशी भावना नाही. सपा आणि बसपा महाआघाडीत येण्यास तयार नाहीत याकडे लक्ष वेधले असता पवार म्हणाले, की आम्हाला देशपातळीवर विरोधकांची आघाडी करायची नाही तर राज्याराज्यात विरोधकांची आघाडी करायची आहे. ज्या राज्यात जो भाजपविरोधी प्रथम क्रमांकाचा पक्ष असेल तेथे त्याला महत्त्व, इतर पक्षांना दुय्यम स्थान, महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादी यांना प्रथम आणि इतरांना दुय्यम स्थान अशी आघाडी केली जाणार आहे. त्यामुळे आताच कोणी आमचा नेता आहे, पंतप्रधान पदासाठी उमेदवार पुढे केला आहे, असे नाही तर ते निवडणुकीनंतर ठरवले जाईल. २००४ च्या निवडणुका आम्ही अशाच लढवल्या होत्या. पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे नाव नंतर ठरवले.

भाजप विरुद्ध काँग्रेस  हेलिकॉप्टर गैरव्यवहारातील दलाल ख्रिस्तियन मिशेल याला काँग्रेस वाचवत आहे, काँग्रेस चौकशीला का घाबरते, असा प्रश्न भाजपने रविवारी विचारला. त्याला, ‘आम्ही सत्तेवर आल्यावर नरेंद्र मोदी, त्यांचे सरकार आणि ऑगस्टा वेस्टलँड यांच्यातील साटय़ालोटय़ाचीच चौकशी करू’, असे उत्तर काँग्रेसने दिले. पुराव्याशिवायच निकाल देण्याची नवी पद्धत मोदी सरकार, ईडी आणि माध्यमांनी सुरू केली, असा टोला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी लगावला आहे, तर एकाच कुटुंबाला बदनाम करणे हाच मोदी सरकारचा एककलमी कार्यक्रम असल्याची टीका शरद यादव यांनी केली आहे.

पवार काय म्हणाले?

  • पुन्हा सत्ता मिळेल की नाही, याची खात्री नसल्याने सत्तेचा गैरवापर
  • विरोधकांना नामशेष करण्यासाठी सत्तेचा असा गैरवापर प्रथमच
  • देशावर आणीबाणी लादण्याची किंमत काँग्रेसलाही चुकवावी लागली
  • मिशेलमामा बोलणार असे मोदी म्हणाले होते, आता सोनिया यांचे नाव पुढे आले आहे
  • कोणाचा मुलगा पंतप्रधान होणार हे, मोदी दोन-तीन महिन्यांपासून सांगत होते
  • शेतकरी कर्जमाफीसाठी आर्थिक पाठबळ देण्याऐवजी मोदींकडून खिल्ली
  • सर्वोच्च न्यायालय, रिझव्‍‌र्ह बँक, सीबीआय या घटनात्मक संस्थांवर केंद्राचे हल्ले