04 August 2020

News Flash

…म्हणून आम्ही २०१४ साली भाजपाला बाहेरुन पाठिंबा दिला : शरद पवार

२०१४ मध्ये भाजपा सोबत सत्ता स्थापनेचा विचार होता का?, या प्रश्नावर पवार म्हणतात...

Sharad Pawar Talks about bjp

महाराष्ट्रामध्ये २०१४ साली झालेल्या विधानसभा निवडणुकांनंतर राष्ट्रवादी काँग्रेसने सरकार स्थापन करण्यासाठी भारतीय जनता पार्टीला बाहेरुन पाठिंबा का दिला होता यासंदर्भातील खुलासा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केला आहे. राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीमध्ये राज्यामध्ये भाजपासोबत सरकार स्थापन करण्यासाठी शरद पवार प्रयत्न करत होते असं म्हटलं होतं. यावरुनच विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना २०१४ साली राष्ट्रवादीने सरकारला बाहेरुन पाठिंबा का दिला होता या गोष्टीवरील पडदा उठवला. पवारांच्या ‘एक शरद सगळे गारद’ या मुलाखतीचा तिसरा आणि शेवटचा भाग आज प्रदर्शित झाला. शिवसेनेचे खासदार आणि ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची खास मुलाखत घेतली असून या मुलाखतीतच पवारांनी २०१४ मधील पाठिंब्यांमागील रहस्य सांगितलं.

नक्की वाचा >> “मी मोदींच्या चेंबरमध्ये गेलो आणि त्यांना सांगून आलो की…”; राज्यातील सत्ता संघर्षासंदर्भात पवारांचा खुलासा

“देवेंद्र फडणवीस यांनी दोन गंभीर आरोप तुमच्यावर केले. त्यांच्या सांगण्यानुसार हे गौप्यस्फोट आहेत. त्यातील पहिला आरोप त्यांनी नुकत्याच एका मुलाखतीमध्ये केला की २०१४ साली तुम्हाला भाजपाबरोबर सरकार बनवायचं होतं. तुम्ही आणि महाराष्ट्रातील वरिष्ठ नेते हे महाराष्ट्रात सरकार बनवण्यासंदर्भात चर्चा करत होते असं त्यांनी ठामपणे सांगितलं होतं,” असा प्रश्न संजय राऊत यांनी पवारांना विचारला. यावेळेस पवारांनी त्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निर्णय घेण्याची क्षमता असण्या इतका अधिकार नव्हता असं मत व्यक्त करताना २०१४ ला भाजपा देण्यात आलेला पाठिंबा ही केवळ राजकीय चाल होती असं म्हटलं आहे.

फडणवीस यांनी केलेल्या आरोपासंदर्भात बोलताना पवारांनी, “ते (फडणवीस) म्हणतात त्याप्रमाणे त्या काळामध्ये मी सेना आणि भाजपाचं सरकार बनू नये असं एक वक्तव्य मी जाणूनबुजून केलं. माझी पहिल्यापासूनची इच्छा होती की सेनेने भाजपासोबत जाऊ नये. पण ते जातील असं ज्यावेळी दिसलं त्यावेळी मी जाणीवपूर्व वक्तव्य केलं की आम्ही तुम्हाला बाहेरुन पाठिंबा देतो. हेतू हा होता की सेना त्यांच्यापासून बाजूला व्हावी. ते घडलं नाही त्यांनी सरकार चालवलं त्यात वाद नाही. मात्र आमचा हा सतत प्रयत्न होता की भाजपाच्या हातात सरकार चालवू देणं हे शिवसेनेच्या हिताचं नाही,” असं सांगितलं.

नक्की वाचा >> “मुख्यमंत्री झाल्यानंतर फडणवीस लोकांना माहित झाले”; ‘त्या’ प्रश्नावरुन पवारांचा टोला

नक्की वाचा >> “सर्व विरोधकांनी एकत्र येऊन देशातील जनतेला राजकीय पर्याय उपलब्ध करुन देणं ही राष्ट्रीय गरज”

“भाजपा आज ना उद्या नक्की धोका देणार”

“दिल्लीची सत्ता त्यांच्या हातात, राज्यातील सत्ता म्हणजेच मुख्यमंत्री त्यांच्या हातात यामुळं सेना किंवा अन्य पक्षाला लोकशाहीमध्ये काम करण्याचा अधिकार आहे हेच त्यांना मान्य नाही. त्यामुळे ते आज ना उद्या निश्चितपणाने धोका देणार आहेत. आणि म्हणून आम्ही पाठिंबा दिला. ती एक राजकीय चाल होती,” असं पवार पुढे बोलताना म्हणाले. फडणवीस यांनी केलेले आरोप चुकीचे असल्याचे सांगत पवारांनी, “फडणवीस सांगतात हे मला अजिबात मान्य नाही. पण आम्ही भाजपा आणि शिवसेनेमध्ये अंतर वाढावं यासाठी मी जाणीवपूर्व पावलं टाकली हे कबूल करतो,” असंही म्हटलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 13, 2020 9:10 am

Web Title: sharad pawar talks about why he decided to support bjp from out side after 2014 maha state assembly election scsg 91
Next Stories
1 “मुख्यमंत्री झाल्यानंतर फडणवीस लोकांना माहित झाले”; ‘त्या’ प्रश्नावरुन पवारांचा टोला
2 Video: एक शरद, सगळे गारद…!; येथे पाहा मुलाखतीचा शेवटचा भाग
3 नेत्यांच्या ३७ साखर कारखान्यांना सरकारचे अभय?
Just Now!
X