सरकारला दुष्काळ, अतिवृष्टी कशाचीच काही माहिती नसून, त्यांना जागेवर आणायचे असेल, तर केवळ मोर्चा काढून चालणार नाही, असे सांगत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी सरकारने शेतकऱयांना महिनाभरात मदत केली नाही, तर १४ सप्टेंबरपासून जेलभरो आंदोलन करण्याचा इशारा दिला. आमचे प्रश्न सोडवा, नाहीतर आम्हाला जेलमध्ये टाका, असे सांगत सर्वांनी या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
मराठवाड्यातील दुष्काळी स्थितीकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शरद पवार यांच्या नेतृत्त्वाखाली शुक्रवारी उस्मानाबादमध्ये मोर्चा काढण्यात आला. उस्मानाबादच्या जिल्हाधिकाऱयांना निवेदन दिल्यानंतर जाहीर सभेत बोलताना शरद पवार म्हणाले, ज्यांच्या हातात सध्या सत्ता आहे. त्यांना गरिबांचे स्मरण नाही. नव्या सरकारची गाडी विकासाच्या दिशेने धावेल, अशी अपेक्षा होती. मात्र, त्यांना अजून सूर सापडलेला नाही. पावसाने दडी मारल्याने शेतकऱयांचे जीवन उदध्वस्त झाले आहे. पण आत्महत्या करून प्रश्न सुटणार नाही. ज्यांच्यामुळे आत्महत्या करण्याची वेळ आली, त्यांना जागेवर आणण्याचे काम आपल्याला करावे लागेल. जिल्हाधिकाऱयांना आज दिलेल्या निवेदनात केलेल्या मागण्या मान्य करण्यासाठी एक महिन्यापर्यंत थांबू. त्यानंतर जेलभरो आंदोलन करू, अशा इशारा त्यांनी दिला.
शेतकऱयांचे प्रश्न मला संसद अधिवेशनात मांडायचे होते. पण कामकाज न झाल्याने २५ दिवस वाया गेले. यापैकी एकही दिवस नरेंद्र मोदी सभागृहात आलेसुद्धा नाही. चर्चा सोडा त्यांनी सभागृहात दर्शनसुद्धा दिले नाही, अशीही टीका त्यांनी केली. उद्या स्वातंत्र्यदिनानिमित्त बहनों-भाईयों म्हणत भाषण करतील. पण गेल्या २५ दिवसांत त्यांना कोणी बहिण-भाऊ दिसला नाही, असा टोलाही त्यांनी मोदींना लगावला.