पंढरपुरातील आषाढी यात्रा तोंडावर आली असताना पंढरपूर शहरातील होत असलेली विकासकामे अपूर्ण व निकृष्ट दर्जाची असल्याचा आरोप करीत शिवसैनिकांनी संताप व्यक्त करीत सोलापूरचे पालकमंत्री दिलीप सोपल यांच्या लाल दिव्याच्या शासकीय वाहनावर कचरा व गटारातील गाळ आणून टाकला. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी हस्तक्षेप करून शिवसेनेचे पंढरपूर शहरप्रमुख संदीप केंदळे यांच्यासह सात शिवसैनिकांना अटक केली.
पंढरपुरात आषाढी यात्रेच्या नियोजनाची आढावा बैठक सोलापूरचे पालकमंत्री दिलीप सोपल हे घेत असताना शिवसैनिकांनी बैठकीच्या बाहेर सोपल यांच्या शासकीय वाहनावर कचरा व गटारातील गाळ आणून टाकला आणि निषेधाच्या घोषणा दिल्या. पोलिसांनी लगेच धाव घेऊन संदीप केंदळे यांच्यासह बाळासाहेब देवकर, दत्तात्रेय पाटील, युवराज गोमेवाडीकर, विशाल पोपळे, नवनाथ चव्हाण व नितीन थिटे या शिवसैनिकांना ताब्यात घेऊन अटक केली. ‘पालकमंत्री तो एक झांकी है, मुख्यमंत्री अभी बाकी है’ असा इशारा देणाऱ्या घोषणा शिवसैनिकांनी दिल्या.