मुंबई : पावसाळी अधिवेशनात विधानसभाध्यक्षपदाची निवडणूक व्हावी यासाठी काँग्रेस आग्रही भूमिका घेत असताना शिवसेनेने मात्र राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पाठवलेल्या पत्रात या निवडणुकीसाठी मुदतीचे बंधन नाही व योग्यवेळी ही निवडणूक घेऊ असे नमूद करत आपल्या भूमिके बाबतचे रहस्य कायम ठेवले आहे.

त्यामुळे विधानसभाध्यक्षांची निवडणूक होणार की नाही याचा निर्णय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी ५ जुलैलाच होईल, असे स्पष्ट होत आहे.

विधानसभाध्यक्षपद काँग्रेसकडे आहे आणि त्या पदाची निवडणूक होऊन त्यावर निवड व्हावी हा पक्षाचा आग्रह असल्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी शुक्रवारी पुन्हा एकदा स्पष्ट के ले. मात्र, शिवसेनेने म्हणजेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कसलाही शब्द देण्याचे टाळले आहे.

आमदारांची संख्या पाहून निर्णय घेण्याकडे त्यांचा कल आहे. त्यांनी राज्यपालांना लिहिलेल्या पत्रात तसे स्पष्ट के ले आहे.

विधानसभा अध्यक्ष काँग्रेसचाच -पटोले

विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक याच अधिवेशानात व्हावी ही महाविकास आघाडीचीही इच्छा आहे. परंतु या मुद्दय़ावरून भारतीय जनता पक्ष राजकारण करत आहे, मात्र त्याची आम्ही दखल घेत नाही, असे  काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केले.  विधानसभेचा अध्यक्ष हा काँग्रेस पक्षाचाच होणार, त्यावर महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नाहीत, असे त्यांनी स्पष्ट के ले.