बांधकाम अधिकाऱ्याच्या श्रीमुखात भडकावली

अर्जविनंत्या आणि निवेदने देऊनही काहीच उपयोग होत नसल्याने अलिबाग आणि मुरुड तालुक्यांतील शिवसेना रस्त्यांच्या प्रश्नाबाबत आक्रमक झाली. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात घुसून शिवसनिकांनी कनिष्ठ अभियंत्यांच्या श्रीमुखात भडकावली.

येत्या शनिवापर्यंत रस्त्यांची कामे केली नाहीत, तर सोमवारी अलिबाग तालुक्यात कडकडीत बंद पाळून रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा या वेळी शिवसेनेने दिला आहे.

अलिबाग तालुक्यातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. यात अलिबाग-रेवदंडा, अलिबाग-रोहा, अलिबाग-मांडवा आणि अलिबाग-वडखळ या रस्त्यांचा समावेश आहे. खराब रस्त्यांमुळे जनता बेजार आहे. वाहने चालवणे कठीण होऊन बसले आहे. १० मिनिटांच्या अंतराला तास ते दीड तास लागत आहे.

मात्र बांधकाम विभागाचे अधिकारी रस्तेदुरुस्तीबाबत उदासीन आहेत. हे रस्ते तातडीने दुरुस्त करावेत अशी मागणी शिवसेनेने एका निवेदनाद्वारे केली होती. त्यानंतरदेखील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी रस्तेदुरुस्तीचे काम सुरू केले नाही. त्यामुळे शिवसनिक संतप्त झाले होते. शिवसेनेने केलेल्या मागणीचे काय झाले, याचा जाब विचारण्यासाठी सोमवारी शिवसनिकांनी रायगड जिल्हा सहसंपर्कप्रमुख सुरेंद्र म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयावर मोर्चा काढला. शिवसैनिक कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न करीत होते, तेव्हा पोलिसांनी त्यांना अडवले. वरिष्ठ अधिकारी कुणीच कार्यालयात हजर नव्हते, त्यामुळे शिवसनिक अधिक संतप्त झाले.

अखेर पोलिसांच्या संरक्षणात कनिष्ठ अभियंता चंदन पवार आले. ते समाधानकारक उत्तर देऊ शकले नाहीत, त्यामुळे संतप्त झालेल्या शिवसनिकांनी त्यांच्या श्रीमुखात भडकावली. या आंदोलनात उपजिल्हाप्रमुख प्रशांत मिसाळ, अलिबाग शहरप्रमुख कमलेश खरवले, विकास पपळे आदी सहभागी झाले होते.

कार्यालयीन वेळेत सर्व अधिकारी गरहजर

रस्त्यांच्या प्रश्नाबाबत शिवसेनेचे शिष्टमंडळ सोमवारी सकाळी ११ वाजता सार्वजनिक बांधकाम विभागात येणार असल्याची पूर्वकल्पना कार्यकारी अभियंता आणि उपविभागीय अभियंता यांना देण्यात आली होती. मात्र दोन्ही अधिकारी सोमवारी सकाळी कार्यालयात फिरकले नाहीत. कार्यकारी अभियंता हे उच्च न्यायालयात असल्याचे, तर उपअभियंता कामानिमित्ताने बाहेर असल्याचे सांगण्यात आले, त्यामुळे शिवसनिकांचा संताप अनावर झाला.